भारतीय रेल्वेने 26 डिसेंबर 2025 पासून नवीन भाडे संरचना लागू केली असून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी भाडेवाढ होणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या तोंडावर भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा धक्का दिला असून रेल्वे भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 26 डिसेंबर 2025 पासून देशभरात नवीन भाडे संरचना लागू होणार असून याचा थेट परिणाम लांब पल्ल्याच्या प्रवासावर होणार आहे. विशेष म्हणजे, ही भाडेवाढ कोणताही गाजावाजा न करता अधिसूचित करण्यात आली आहे.
रेल्वेने जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार उपनगरीय रेल्वे प्रवासी आणि मासिक सीझन तिकीट (एमएसटी) धारकांना दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच साध्या श्रेणीत 215 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठीही भाडे पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. त्यामुळे छोट्या आणि मध्यम अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही.
मात्र, 215 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी भाडेवाढ लागू होणार आहे. नव्या भाडे संरचनेनुसार साध्या श्रेणीत 215 किलोमीटरच्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 1 पैसा अतिरिक्त आकारण्यात येणार आहे. तर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या नॉन-एसी तसेच एसी श्रेणीत प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. उदाहरणार्थ, 500 किलोमीटर अंतराच्या नॉन-एसी प्रवासासाठी आता प्रवाशाला सुमारे 10 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून ही भाडेवाढ अत्यंत मर्यादित असल्याचा दावा करण्यात येत असून सामान्य प्रवाशांवर याचा फारसा परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, नियमितपणे लांब अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही वाढ निश्चितच जाणवणार आहे.
दरम्यान, या भाडेवाढीमुळे चालू आर्थिक वर्षात रेल्वेला सुमारे 600 कोटी रुपयांची अतिरिक्त महसूलवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वेच्या नेटवर्कमध्ये मोठी वाढ झाली असून सुरक्षितता आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च वाढला आहे.
रेल्वेच्या आकडेवारीनुसार मनुष्यबळावरचा खर्च वाढून 1.15 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय दरवर्षी सुमारे 60 हजार कोटी रुपये पेन्शनवर खर्च होत आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात रेल्वेचा एकूण ऑपरेशनल खर्च सुमारे 2.63 लाख कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. या वाढत्या खर्चाचा तोल सांभाळण्यासाठी मालवाहतूक वाढवण्यासोबतच प्रवासी भाड्यात सौम्य वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की, या उपाययोजनांचा थेट परिणाम सेवा आणि सुरक्षिततेवर सकारात्मक झाला आहे. भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक मालवाहतूक करणारे रेल्वे नेटवर्क बनलं आहे. सणासुदीच्या काळात 12 हजारांहून अधिक विशेष गाड्यांचं यशस्वी संचालन हेही रेल्वेच्या सक्षम व्यवस्थेचं उदाहरण असल्याचं सांगण्यात येत आहे. एकूणच, भाडेवाढ किरकोळ वाटत असली तरी लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आता प्रवासाची आखणी करताना या बदलाचा विचार करावा लागणार आहे.
-------------------------------------------------------------
