नगरपालिका–नगरपंचायत निवडणूक 2025 निकालांत भाजप व महायुतीत घराणेशाहीचा जोर; मंत्र्यांच्या व आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी व विजय.
मुंबई : महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे. राज्यातील एकूण 288 पैकी तब्बल 207 ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आल्याने सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व कायम राहिला आहे. मात्र, या यशासोबतच भाजपच्या ‘आमच्या पक्षात घराणेशाहीला स्थान नाही’ या दाव्यालाच या निकालांनी मोठा प्रश्नचिन्ह लावलं आहे. गावगाड्यापासून नगरपरिषदांपर्यंत घराणेशाहीचा प्रभाव ठळकपणे दिसून आला आहे.
भाजपकडून काँग्रेससह विरोधकांवर सातत्याने घराणेशाहीचे आरोप केले जात असताना, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपच्या अनेक मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या पत्नी, सून, मुलगी, भाऊ तसेच इतर नातेवाईकांना थेट उमेदवारी देण्यात आली. केवळ उमेदवारीच नव्हे तर अनेक ठिकाणी हे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं चित्रही दिसून आलं. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
घराणेशाहीचं सर्वात ठसठशीत उदाहरण म्हणजे भाजपचे मंत्री गिरीश महाजन. त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आणि कोणताही विरोध न होता त्या बिनविरोध निवडून आल्या. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती यांनी चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधातील सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने कलोती यांचा विजयही बिनविरोध झाला.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आणि त्या देखील बिनविरोध निवडून आल्या.
भुसावळचे भाजप आमदार आणि मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. कागल नगरपालिकेत मंत्री हसन मुश्रीफ यांची सून सेहरनिदा मुश्रीफ नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून आल्याचंही निकालांत स्पष्ट झालं. याशिवाय भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना खामगाव नगरपालिकेसाठी तिकीट देण्यात आलं होतं.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मुलगी वतामाळ नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरली होती. विशेष म्हणजे तिच्याविरोधात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे रिंगणात होती. एका निवडणुकीत दोन वेगवेगळ्या राजकीय घराण्यांतील उमेदवार आमनेसामने आल्याने घराणेशाहीचा मुद्दा आणखी ठळक झाला.
फक्त मंत्रीच नव्हे तर भाजपच्या आमदारांमध्येही घरातील व्यक्तींना उमेदवारी देण्याची चढाओढ दिसून आली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आमदार अमरीश पटेल यांचे पुत्र चिंतन पटेल यांना तिकीट देण्यात आलं. चाळीसगाव नगरपालिकेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या. मूर्तिजापूर नगरपरिषदेत भाजप आमदार हरीश पिंपळे यांचे मोठे बंधू भूपेंद्र पिंपळे यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्यात आली.
अक्कलकोट येथे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांनाही पक्षाकडून उमेदवारी मिळाली. तर धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणी अर्चना रोठे यांना तिकीट देण्यात आलं. या सर्व उदाहरणांमुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख सांगणाऱ्या भाजपमध्येही इतर पक्षांप्रमाणेच घराणेशाही बळावत असल्याचं चित्र स्थानिक निवडणुकांतून समोर आलं आहे.
महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, नगरपालिका आणि नगरपंचायत निकालांनी घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्याचा दावा करणाऱ्या भाजपसमोर आता या विरोधाभासावर काय भूमिका घेतली जाणार, याकडे राज्याचं राजकीय लक्ष लागलं आहे.
------------------------------------------------
