आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपवर टीका करत कुटुंब आणि लग्न हे समाज, संस्कृती व मूल्यांची शाळा असल्याचं कोलकत्त्यातील भाषणात स्पष्ट केलं.
कोलकत्ता : भारतीय समाज व्यवस्थेतील कुटुंबसंस्थेचं महत्त्व अधोरेखित करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपवर स्पष्ट आणि परखड मत मांडलं आहे. पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे आयोजित एका आरएसएसच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कुटुंब आणि लग्न ही केवळ शारीरिक समाधानाची साधनं नसून समाजनिर्मितीचा कणा असल्याचं त्यांनी सांगितलं.
मोहन भागवत म्हणाले की, लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना सर्वांसमोर आहे, मात्र यात जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दिसून येत नाही.
जबाबदारी न घेता एकत्र राहणं हे योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कुटुंब ही अशी जागा आहे, जिथे व्यक्ती समाजात कसं राहायचं हे शिकतो. माणसाला मिळणारी मूल्यं, संस्कार आणि जबाबदारीची जाणीव ही कुटुंबातूनच तयार होते, असं भागवत यांनी नमूद केलं. कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नसून ती संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा संगम असल्याचंही त्यांनी सांगितलं. बचत, सोनं, आर्थिक नियोजन, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक जबाबदाऱ्या या सगळ्यांचा केंद्रबिंदू कुटुंब असतं. काही मूल्यं स्वीकारूनच समाजाला आकार दिला जातो आणि हे काम कुटुंबव्यवस्थेमधूनच होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
लग्न करायचं नसेल, तर सन्यासी होणंही स्वीकार्य आहे, मात्र जबाबदारी नाकारून नातेसंबंध ठेवणं योग्य नाही, असं स्पष्ट मत मोहन भागवत यांनी मांडलं. कुटुंबव्यवस्थेबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, मुलांची संख्या किंवा लग्नाचं वय ठरवण्यासाठी कोणताही ठराविक फॉर्म्युला नाही. मात्र संशोधनातून असं दिसून आलं आहे की, 19 ते 25 या वयोगटात लग्न झाल्यास कुटुंब आणि आरोग्याच्या दृष्टीने ते अधिक अनुकूल ठरू शकतं.
तीन मुलं असलेलं कुटुंब आदर्श ठरू शकतं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. डॉक्टर आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, तीन मुलं असल्यास आई-वडील आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहतं. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, तीन मुलं असलेल्या कुटुंबात व्यक्तींना अहंकार नियंत्रणात ठेवणं, समन्वय साधणं आणि जबाबदारी वाटून घेणं शिकायला मिळतं, असं भागवत म्हणाले.
लोकसंख्येबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, लोकसंख्या ही एकीकडे ओझं असू शकते, मात्र तीच योग्य नियोजन केल्यास देशासाठी मोठी संपत्तीही ठरू शकते. पर्यावरण, पायाभूत सुविधा, उपलब्ध सोयी-सुविधा, महिलांची स्थिती, त्यांचं आरोग्य आणि देशाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पुढील 50 वर्षांचा विचार करत लोकसंख्येचं धोरण ठरवलं पाहिजे, असंही मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं.
----------------------------------------
