यल्लम्मा देवीची तीन दिवसांची भव्य यात्रा!

 देशभरातून हजारो तृतीयपंथी कासेगावात दाखल, दागदागिन्यांचा शृंगार आणि परंपरेचा मोठा उत्सव

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात कासेगाव येथे यल्लम्मा देवीची तीन दिवसांची यात्रा सुरू झाली असून देशभरातून हजारो तृतीयपंथी भाविक सहभागी झाले आहेत.

सोलापूर : समाजाने अनेकदा दुर्लक्षित केलेल्या तृतीयपंथीयांसाठी एकतेचा, श्रद्धेचा आणि उत्सवाचा सोहळा ठरणारी यल्लम्मा देवीची पारंपरिक यात्रा पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आजपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, ओडिशा आदी राज्यांतून हजारो तृतीयपंथी जगजोगतीणी या यात्रेसाठी कासेगावात दाखल झाल्या असून गाव परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी भीक मागून जीवन जगणारी ही मंडळी या यात्रेच्या निमित्ताने एकत्र येतात. रंगीबेरंगी आकर्षक वेशभूषा, लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, पारंपरिक शृंगार आणि डोक्यावर देवीचे मुखवटे घेऊन यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जोगते मोठ्या श्रद्धेने मंदिरात दाखल होत आहेत. तृतीयपंथीयांसाठी हा वर्षातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो.

आज यात्रेचा मुख्य दिवस असून गावचे मानकरी वसंत नाना देशमुख यांच्या वाड्यातून सवाद्य यल्लम्मा देवीचा नैवेद्य मंदिरात नेण्यात आला. परंपरेनुसार मानकऱ्यांच्या कमरेला लिंबाचे फाटे गुंडाळून वाजत-गाजत ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनीही आपल्या नवसपूर्तीसाठी लिंब बांधून देवीचे दर्शन घेतले.

कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुमारे 100 वर्षांची परंपरा असून ही यात्रा प्रामुख्याने तृतीयपंथीयांची यात्रा म्हणून ओळखली जाते. कर्नाटकातील सौदंती, कोकटनूर, जत आदी ठिकाणी यल्लम्मा देवीची प्रमुख देवस्थाने असली तरी कासेगावची यात्रा वेगळ्या धार्मिक आणि सामाजिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. समाजाने नाकारलेल्या, झिडकारलेल्या तृतीयपंथीयांचा जणू मोठा मेळा या यात्रेच्या माध्यमातून भरतो आणि श्रद्धा, परंपरा व आत्मसन्मानाचा उत्सव साजरा होतो.

-------------------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने