‘भारताच्या राजकारणात खळबळ’ उडवून देण्याचा दावा
अमेरिकेतील एपस्टीन फाईल्स 19 डिसेंबर रोजी संसदेत खुल्या होणार असून त्यातून भारताच्या राजकारणावरही मोठा परिणाम होईल, असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
मुंबई : अमेरिकेतील गाजलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरणातील तथाकथित ‘एपस्टीन फाईल्स’ 19 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत खुल्या होणार असून त्यातून समोर येणारी माहिती जगाला हादरवणारी असेल आणि भारताच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे गंभीर आरोप मांडले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जेफ्री एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगभरातील अनेक प्रभावशाली राजकारणी आणि बड्या व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवून हनी ट्रॅपमध्ये अडकवले. या प्रकरणात भारतातील काही आजी-माजी खासदारांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे देशातील पंतप्रधान बदलण्याची शक्यता असून नागपूरशी संबंधित व्यक्ती पंतप्रधानपदावर बसेल, असा तर्कही त्यांनी व्यक्त केला. याआधीही त्यांनी असा दावा केला होता आणि आताही ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही टीका करत ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. एपस्टीन फाईल्समधील अनेक गोष्टी अमेरिकेच्या संसदेसंबंधित वेबसाईटवर उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.
एपस्टीन कांडाची पार्श्वभूमी सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 1995 पासून जेफ्री एपस्टीनने अल्पवयीन मुलींच्या माध्यमातून मोठ्या राजकारण्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. काही मुलींच्या तक्रारीनंतर त्याला 13 महिन्यांची शिक्षा झाली होती. त्यानंतर पुन्हा त्याला तुरुंगात टाकण्यात आले. त्याने केलेल्या कृत्यांची माहिती आणि त्यामध्ये अडकलेल्या लोकांची नावे जगासमोर येऊ नयेत म्हणून त्याच्यावर दबाव होता, असा दावाही त्यांनी केला
ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील हाय सिक्युरिटी तुरुंगात एपस्टीनने आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती समोर आली होती. मात्र, त्या घटनेवर अनेकांनी संशय व्यक्त केला. हाय सिक्युरिटी तुरुंगात त्याला दोर कुठून मिळाला आणि त्याने आत्महत्या कशी केली, असे प्रश्न उपस्थित झाले. पोस्टमॉर्टम अहवालानंतर त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय काही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
या प्रकरणात शंभरहून अधिक मुलींनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून अमेरिकेच्या संसदेतही याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. या फाईल्समध्ये अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, उद्योगपती बिल गेट्स तसेच इंग्लंडचे युवराज प्रिन्स अँड्र्यू यांची नावे आल्याची चर्चा आहे. बिल गेट्स यांनी एपस्टीनशी संपर्क झाल्याचे मान्य केले असून प्रिन्स अँड्र्यू यांनी आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
---------
