ऐश्वर्याबद्दल म्हणाला “माझ्या बायकोला माझं सत्य माहीत आहे”
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून विविध चर्चा रंगताना दिसत होत्या. विभक्त राहणे, कुटुंबातील वाद, अगदी घटस्फोटापर्यंत अनेक अफवा पसरल्या. एअरपोर्टवर ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत अनेकदा एकटी दिसणे, तसेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात बच्चन कुटुंबासोबत न दिसणे या सर्व घटनांमुळे चर्चांना अधिक हवा मिळाली. मात्र, या सर्वांवर आजवर बच्चन कुटुंबीयांनी कोणतेही भाष्य केले नव्हते. आता पहिल्यांदाच अभिषेक बच्चनने या अफवांवर उघड आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
अभिषेकने दिलेल्या ताज्या मुलाखतीत सततच्या घटस्फोटाच्या बातम्यांबद्दल नाराजी व्यक्त करताना तो म्हणाला की, “पूर्वी आमचं लग्न कधी होणार याची उत्सुकता लोकांना होती. आता आमचा घटस्फोट कधी होणार याची चर्चा ते करत आहेत. माझ्या बायकोला माझं सत्य माहीत आहे आणि मला तिचं. आमचं कुटुंब आनंदी आणि निरोगी आहे, हेच महत्त्वाचं.” फिल्म इंडस्ट्रीत वाढल्यामुळे आणि पत्नीही त्याच क्षेत्रातील असल्यामुळे अफवांना कसं सामोरं जायचं हे दोघांनाही माहीत असल्याचे तो म्हणाला. मीडिया हा देशाचा विवेक असला तरी चुकीच्या बातम्या देण्याच्या घाईत अनेकदा मर्यादा ओलांडल्या जातात, असा टोला त्याने लगावला.
एका प्रश्नाला उत्तर देताना अभिषेकने स्पष्ट केलं की आराध्या बच्चनला या अफवांची काहीही कल्पना नाही. “माझी मुलगी फक्त 14 वर्षांची आहे. तिच्याकडे स्वतःचा फोनही नाही. ती अत्यंत समजदार आहे आणि तिची आई तिच्यावर उत्तम संस्कार करते. आमच्याबद्दल इंटरनेटवर काय चर्चा चालू आहे, हे ती शोधत बसत नाही,” असे तो म्हणाला. त्याने घटस्फोटाच्या बातम्यांना सरळ “बकवास, घाणेरडे आणि चुकीचे” ठरवत नात्यात कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले.
आराध्याच्या अलीकडील वाढदिवशी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या खास पोस्टमुळे कुटुंबातील नातेसंबंध पूर्ववत असल्याचे संकेतही मिळाले होते. अखेर अभिषेकने या सर्व चर्चांवर पूर्णविराम देत कुटुंबाविषयी असलेल्या जबाबदारीची जाणीव सर्वांनी ठेवावी, असे आवाहन केले आहे.
------------------------------------------------------
