एकनाथ शिंदे–रवींद्र चव्हाण बैठकीत महत्त्वाचा तोडगा
नागपूर: महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यात नागपूरमधील देवगिरी बंगल्यावर महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याबाबत एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरसह बहुतेक सर्व महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप संयुक्तरित्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र नवी मुंबई महापालिकेबाबत अद्यापही अनिश्चितता कायम असल्याची माहिती समोर येते.
बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यावर चर्चा झाली. दोन्ही पक्षांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांची संयुक्त कमिटी स्थापन करून जागावाटप, स्थानिक समीकरणे आणि संघटनात्मक गरजांनुसार निर्णय घेण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. महायुती म्हणून निवडणुका लढवताना स्थानिक नेत्यांमधील समन्वय वाढवणे आणि दोन्ही संघटनांना समान महत्त्व देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचेही कळते.
यापूर्वी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकां दरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. प्रचारसभांमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर तीव्र टीका आणि आरोप-प्रत्यारोपांचा सूर लावल्याने महायुतीतील तणाव चव्हाट्यावर आला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली. विशेषतः मुंबई महापालिका आणि इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महायुतीची एकजूट आवश्यक असल्याचे त्या बैठकीत ठरले होते. त्यानुसार पुढील रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीचा एक भाग म्हणून रवींद्र चव्हाण यांनी नागपूर येथे शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते. येत्या जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्या अनुषंगाने महायुतीची तयारी आता अंतिम टप्प्यात जात आहे.
---------
