माजी लोकसभा अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी लोकसभा अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे लातूर येथे वयाच्या 90 व्या वर्षी निधन; भारतीय राजकारणातील अत्यंत अभ्यासू, स्वच्छ प्रतिमा आणि पाच दशकांहून अधिक सेवाकाळ असलेल्या या दिग्गज नेत्यानं घेतला अखेरचा श्वास

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं लातूर येथील निवासस्थानी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते; अखेर आज त्यांनी अंतिम श्वास घेतला. पाच दशकांच्या सक्रिय राजकारणात स्वच्छ, अभ्यासू व शिस्तबद्ध कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेल्या पाटील यांनी संसदीय आणि प्रशासकीय क्षेत्रात अनुपम योगदान दिले.

१२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मलेल्या शिवराज पाटील यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. १९६७-६९ दरम्यान लातूर नगरपालिकेतून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये ते प्रथमच लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात वेळा विजय मिळवत लोकसभेतील प्रभावी आणि अभ्यासू नेता म्हणून उदयास आले.

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि अवकाश यांसारख्या महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सांभाळली. १९९१ ते १९९६ या कालावधीत ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. संसदेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, कामकाजाचे थेट प्रक्षेपण आणि नवीन ग्रंथालय इमारत या महत्त्वपूर्ण उपक्रमांना चालना देण्याचे मोठे श्रेय त्यांना दिले जाते. जगभरातील विविध संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्वही केले.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. २००४ मधील पराभवानंतरही त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवत त्यांना केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यात आले. मात्र २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून ३० नोव्हेंबर २००८ रोजी त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. २०१० ते २०१५ दरम्यान ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही पाटील यांनाच जाते.

वैयक्तिक आयुष्यात ते लिंगायत समाजातील असून, १९६३ मध्ये विजया पाटील यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या राजकारणात सक्रिय आहेत. दोन नाती आहेत. सत्य साई बाबांचे निष्ठावान अनुयायी म्हणूनही त्यांची ओळख होती. संसदीय, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे शिवराज पाटील चाकूरकर हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून सदैव स्मरणात राहतील.

---------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने