भरती प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याची टीका
Maharashtra Professor Recruitment : महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी जाहीर झालेल्या ६०-४० सूत्रालाही विरोध होत असून यूजीसी नियमांनुसार भरती करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.
पुणे : राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ६०-४० गुणभार सूत्रालाही विरोध सुरू झाला असून, या निर्णयामुळे भरती प्रक्रिया आणखी लांबणीवर पडत असल्याची टीका उच्च शिक्षण क्षेत्रातून होत आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार प्राध्यापक भरतीसाठी ६०-४०चे सूत्र अवलंबण्यात येणार असून त्याला राज्यपालांची मान्यता मिळाल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त असून त्याचा थेट परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होत आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून नियमित भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरुवातीला शैक्षणिक पात्रतेसाठी ८० आणि मुलाखतीसाठी २० असा गुणभार निश्चित केला होता. मात्र, या सूत्राला तीव्र विरोध झाल्यानंतर ७५-२५चे सूत्र जाहीर करण्यात आले.
७५-२५च्या सूत्रालाही स्थानिक उमेदवार, मानव्यविज्ञान शाखेतील पात्रधारक आणि नव्याने पात्रता मिळवलेल्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत विरोध करण्यात आला. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता ६०-४०चे नवे सूत्र जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नसून, या नव्या सूत्रालाही उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पात्र उमेदवारांकडून विरोध दर्शवला जात आहे.
माजी कुलगुरू तसेच भारतीय विद्यापीठ महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ. माणिकराव साळुंखे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. प्राध्यापक भरतीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्पष्ट आणि सर्वसमावेशक नियमावली असताना राज्य सरकारने स्वतंत्र सूत्र ठरवण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. यूजीसीच्या नियमांनुसारच भरती प्रक्रिया राबवून ती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडेल याची दक्षता घेणे हेच राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भरतीसाठी वारंवार सूत्र बदलले जात असल्याने प्रत्यक्ष भरती प्रक्रिया रखडत असून विद्यापीठांमधील शैक्षणिक वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भावना शिक्षक संघटना आणि पात्र उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीचा प्रश्न नेमका कधी मार्गी लागणार, याकडे संपूर्ण उच्च शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
_______
