दहा शहरांतील अभ्यासातून धक्कादायक वास्तव उघड
School Children Addiction : देशातील शाळकरी मुलांमध्ये तंबाखू, मद्य व अमली पदार्थांचे व्यसन सरासरी १३व्या वर्षी सुरू होते. हे अभ्यासातून उघड झाले आहे.
मुंबई : देशातील शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच अमली पदार्थांचे व्यसन सरासरी अवघ्या १३व्या वर्षीच सुरू होत असल्याचे धक्कादायक वास्तव एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. एम्स दिल्लीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात भारतातील दहा प्रमुख शहरांमधील शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता.
या अभ्यासात इयत्ता ८, ९, ११ आणि १२ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असून एकूण ५,९२० विद्यार्थ्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार अमली पदार्थांच्या वापराची सरासरी सुरुवातीची वयमर्यादा १२.९ वर्षे असल्याचे नोंदवण्यात आले आहे. लहान वयातच व्यसनांचा पहिला अनुभव घेतल्याचे प्रमाण लक्षणीय असल्याने पालक, शाळा आणि प्रशासनासाठी ही बाब गंभीर मानली जात आहे.
अभ्यासात विशेष चिंताजनक बाब म्हणजे इंहेलंट्स म्हणजेच श्वसनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या पदार्थांचा वापर सर्वात कमी वयात सुरू होत असल्याचे आढळून आले. या पदार्थांच्या वापराची सरासरी सुरुवात ११.३ वर्षे इतकी कमी आहे. त्यानंतर हेरॉइनचा वापर सरासरी १२.३ वर्षे आणि वैद्यकीय औषधांच्या गैरवापराची सुरुवात १२.५ वर्षांपासून होत असल्याचे दिसून आले. तंबाखू आणि मद्यपान हे सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ असल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधी ना कधी व्यसनाधीन पदार्थांचा वापर केल्याचे मान्य केले आहे. यापैकी १०.३ टक्के विद्यार्थ्यांनी मागील एका वर्षात, तर ७.२ टक्के विद्यार्थ्यांनी मागील एका महिन्यात अशा पदार्थांचा वापर केल्याचे सांगितले. हे आकडे शालेय वयातील व्यसनाधीनतेचे गांभीर्य अधोरेखित करणारे आहेत.
चिंतेची बाब म्हणजे जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी तंबाखू सहज उपलब्ध असल्याचे नमूद केले असून ३६ टक्के विद्यार्थ्यांनी मद्य सहज मिळत असल्याचे सांगितले आहे. यामुळे अल्पवयीन मुलांपर्यंत व्यसनाधीन पदार्थ किती सहज पोहोचत आहेत, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शासनाने शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी घातली असली तरी प्रत्यक्षात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र या अभ्यासातून समोर आले आहे.
विशेष म्हणजे ९५ टक्के विद्यार्थ्यांना व्यसन हानिकारक असल्याची जाणीव असूनही त्यांचा वापर सुरू असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये व्यसनांचे प्रमाण अधिक असले तरी शहरी भागांमध्ये मुलींमध्येही धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण वाढत असल्याचे अभ्यासकांनी नमूद केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शालेय आणि महाविद्यालयीन परिसरात केवळ तंबाखूजन्य पदार्थच नव्हे तर चरस, गांजा आणि इतर अमली पदार्थही सहज उपलब्ध होत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला गमतीचा भाग म्हणून, नंतर मित्रांच्या आग्रहामुळे आणि पुढे सवयीचा भाग म्हणून हा व्यसनाधीनतेचा प्रवास शालेय जीवनातच सुरू होतो. त्यामुळे व्यसनप्रतिबंधक उपाययोजना प्राथमिक शाळेपासूनच राबवण्याची तातडीची गरज या अभ्यासातून अधोरेखित करण्यात आली आहे. केवळ जनजागृती पुरेशी नसून पालक, शाळा, समाज आणि प्रशासन यांच्या समन्वयातून ठोस उपाययोजना केल्याशिवाय ही समस्या आटोक्यात येणार नाही, असा इशाराही अभ्यासकांनी दिला आहे.
----------
