बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांनी ६० वा वाढदिवस पनवेल फार्महाऊसवर साजरा केला. पार्टीत कुटुंबीयांसह बॉलिवूड कलाकार आणि माजी क्रिकेट कर्णधार एम.एस. धोनी यांची उपस्थिती होती.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांने २७ डिसेंबर रोजी आपला ६० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. पनवेल येथील त्यांच्या फार्महाऊसवर आयोजित करण्यात आलेल्या या खासगी पण तितक्याच भव्य सोहळ्यात कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत चेहरे सहभागी झाले होते. वाढदिवसाच्या दिवशी सलमान खान फार्महाऊसबाहेर जमलेल्या पॅपराझींमध्ये आले आणि त्यांच्यासोबत केक कापून चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला. फोटो काढण्याआधी त्यांनी पॅपराझींनाही केकचा तुकडा देत आपला दिलखुलास स्वभाव दाखवून दिला.
हा वाढदिवस सोहळा प्रामुख्याने खासगी ठेवण्यात आला असला तरी पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांची यादी मात्र लक्षवेधी ठरली. बॉलिवूडमधील अनेक आघाडीचे कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आदित्य रॉय कपूर, रकुल प्रीत सिंग, हुमा कुरैशी यांच्यासह इतर अनेक कलाकारांची उपस्थिती दिसून आली. सलमान खानचे संपूर्ण कुटुंब या खास दिवशी एकत्र आले होते. भाऊ अरबाज खान पत्नी शूरा खानसोबत उपस्थित होते, तर पुतणे अरहान खान आणि निर्वाण खानही फार्महाऊसवर दिसले. बहीण अर्पिता खान पती आयुष शर्मा यांच्यासह पार्टीत सहभागी झाली होती.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माजी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची उपस्थिती. धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झीवा यांच्यासह पार्टीत दाखल झाले. त्यांच्यासोबत अभिनेत्री तब्बूही दिसल्या. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई सलमा खान यांची उपस्थिती असल्याने हा वाढदिवस सोहळा पूर्णतः कौटुंबिक आणि भावनिक स्वरूपाचा ठरला.
वाढदिवसाच्या आनंदासोबतच सलमान खानच्या आगामी चित्रपटांबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. विशेषतः ‘बॅटल ऑफ गलवान’ या आगामी चित्रपटाबाबत नवी घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खान त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पुढील वाटचालीबाबत एखादी मोठी माहिती देणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खान यांनी आपल्या लोकप्रियतेचा आणि चाहत्यांशी असलेल्या घट्ट नात्याचा प्रत्यय दिला असून, हा दिवस त्यांच्या चाहत्यांसाठीही खास ठरला आहे.
----------------------------------------------------
