नांदेड : आंतरजातीय प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या सक्षम ताटे हत्याकांडात एक मोठा आणि गंभीर तपशील उघड झाला आहे. २७ नोव्हेंबर रोजी जुनागंज परिसरात सक्षम ताटेची गोळ्या झाडून आणि डोक्यात फरशी घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेपूर्वी आरोपींनी सक्षमच्या घरावर लक्ष ठेवून रेकी केल्याचे स्पष्ट करणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
फुटेजमध्ये मुलीचा भाऊ आणि त्याचे सहकारी मिळून पाच ते सहा तरुण सक्षमच्या घराजवळ वावरत असल्याचे दिसत असून पोलिसांना तपासाचा महत्त्वाचा धागा मिळाला आहे. या व्हिडिओवरून पोलिसांकडून आरोपींच्या हालचालींची सखोल माहिती गोळा केली जात असून हत्येचा कट किती नियोजनबद्ध पद्धतीने आखला होता याचे पुरावे अधिक बळकट होत आहेत.
या प्रकरणात सातवा आरोपी अमन देविदास शिरसे याला पोलिसांनी दोन नोव्हेंबरच्या रात्री अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी एक महिला आणि एका अल्पवयीनासह सहा आरोपींना अटक झाली होती, तर चार जणांना चार डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी आहे.
सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार यांच्यातील प्रेमसंबंधांना मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता आणि त्यातच हत्या घडवून आणण्यात आली असा आरोप सक्षमच्या कुटुंबियांनी केला आहे. आंचलच्या कुटुंबाचा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंध असल्याचा आरोपही समोर आला असून सक्षमच्या आईनुसार हत्या करण्याचा प्लान आधीपासूनच तयार करण्यात आला होता.
आंचलच्या भावाने सक्षमच्या वाढदिवसाला काटेरी गुलाबाचे रोप भेट म्हणून देऊन त्यावेळीच प्रतीकात्मक इशारा दिल्याचा दावा सक्षमच्या आईने केला आहे. सुरुवातीला लग्नाला होकार देऊन नंतर पाळत ठेवून मुलाचा जीव घेतला गेल्याचे सक्षमच्या आईचे वक्तव्य पोलिस तपासाला नवे वळण देणारे ठरत आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींची हालचाल, घटना पूर्वनियोजन आणि हत्या करण्यापूर्वी केलेला पाठलाग यांचा तपास अधिक वेगाने पुढे सरकण्याची शक्यता वाढली आहे. या प्रकरणातील प्रत्येक नवीन उलगडा जिल्ह्यात खळबळ माजवत आहे.
--------------------------------------------------
