ना गोवा.. ना काश्मीर…पहा पर्यटनाचा नवा ट्रॅव्हल ट्रेंड
मुंबई : गूगलच्या वार्षिक ‘ईयर इन सर्च २०२५’ अहवालानुसार या वर्षी भारतीयांच्या प्रवासाच्या आवडींमध्ये मोठा बदल दिसून आला आहे. समुद्रकिनारे आणि हिल स्टेशनचे पारंपरिक आकर्षण मागे पडले असून, भारतीयांमध्ये अध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासाबद्दलची ओढ सर्वाधिक वाढलेली दिसली. याचाच परिणाम म्हणून गोवा किंवा कश्मीर नव्हे तर प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळा २०२५ हा देशातील सर्वाधिक शोधला गेलेला ट्रॅव्हल डेस्टिनेशन ठरले ठरले. गूगलवरील ट्रॅव्हल सर्च श्रेणीत पहिल्या क्रमांकावर आलेल्या महाकुंभाने संपूर्ण वर्षभर टॉप ट्रेंडिंग न्यूज आणि ट्रॅव्हल कीवर्ड्समध्येही आपले स्थान कायम ठेवले.
पूर्वी धार्मिक पर्यटन हे मुख्यतः वृद्ध व्यक्तींशी जोडले गेले होते, परंतु यावेळी तरुण पिढीने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचे ट्रॅव्हल तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. योग, ध्यान, भारतीय शास्त्रीय संगीत, अध्यात्मिक कला आणि परंपरांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढल्याने सांस्कृतिक ओळखीशी जोडून घेण्याचा नवा प्रवास ट्रेंड आकार घेताना दिसतो.
महाकुंभामुळे वाराणसी, ऋषिकेश, हरिद्वार आणि बोधगया यांसारख्या शहरांच्या सर्चमध्येही उल्लेखनीय वाढ झाली असून, धार्मिक पर्यटन हे भविष्यातील मोठे मार्केट ठरण्याची चिन्हे अधिक स्पष्ट झाली आहेत. आध्यात्मिक प्रवासाच्या या उभ्या राहिलेल्या लाटेत सोमनाथही टॉप टेन ट्रेंडिंग सर्चमध्ये समाविष्ट झाले, ज्यातून भारतीय प्रवासी आता केवळ मनोरंजन आणि मस्तीपेक्षा मन:शांती, अनुभव आणि सांस्कृतिक जडणघडीकडे अधिक आकर्षित होत असल्याचे चित्र दिसले.
तरीही प्रवाशांनी समुद्रकिनारे आणि बेट पर्यटन पूर्णपणे विसरलेले नाही. फिलिपिन्स यंदा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक शोधला गेलेला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ ठरले, तर फु क्वॉक, फुकेत आणि मालदीव यांसारख्या ठिकाणांचे शोधही चांगल्या प्रमाणात वाढले. युरोपमध्ये जॉर्जिया भारतीयांचा लोकप्रिय पर्याय बनले. मात्र सर्वाधिक चर्चेत आणि सर्वाधिक शोधांमध्ये केवळ एकच नाव चमकले महाकुंभ मेळा २०२५, ज्याने जगभरातील पर्यटन क्षेत्राला भारतीय अध्यात्मिक शक्तीची जाणीव करून दिली आहे.
-------------------------------------------------------
