AI बबल फुटणार ? गुगल सर्च कमी, शेअर्स कोसळले

 

12 ट्रिलियन डॉलरच्या बूमवर संकट तज्ज्ञांचा इशारा

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झपाट्याने वाढलेल्या बाजाराबाबत आता गंभीर इशारे समोर येत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात मागील दोन वर्षांत दिसलेला AI बूम हळूहळू थंडावतोय का? गुगल ट्रेंड्सच्या आकडेवारीत दिसणारी तीव्र घसरण, AI आधारित कंपन्यांच्या शेअर्समधील कमजोरी आणि महागड्या गुंतवणुकीवर ब्रेक लावणाऱ्या टेक कंपन्यांच्या हालचालींनी संशय अधिक गडद केला आहे. बँक ऑफ इंग्लंडच्या ताज्या अहवालानुसार AI कंपन्यांची बाजारमूल्यांकनं अत्यंत वाढलेली असून कर्जाच्या धोक्याची पहिली चिन्हे दिसू लागली आहेत. MIT च्या सर्वेक्षणात 95% AI पायलट प्रोजेक्ट्सने कोणताही प्रत्यक्ष रिटर्न दिला नाही, तर उद्योगविशेषज्ञांचा दावा आहे की AI बबल तयार झाला आहे आणि तो फुटण्याची शक्यता वेळेचीच आहे.

गूगल ट्रेंड्सच्या नव्या डेटा नुसार ‘AI Stocks’ मध्ये गुंतवणूकदारांच्या शोधांचा आकडा काही दिवसांत अर्ध्यावर आला. अशा प्रकारचा ग्राफ साधारणतः सट्टेबाज बबलमध्ये दिसतो हळू वाढ, अचानक तीव्र उडी आणि त्यानंतर उतारावर मोठी घसरण. सर्च ट्रेंड कोसळताच बाजारानेही झटका खाल्ला. AI बूमचे चेहरा ठरलेली Nvidia कंपनी 4.4 ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट कॅपपासून ऑक्टोबरच्या 207 डॉलरच्या टॉपपासून डिसेंबरच्या सुरुवातीला 181 डॉलरपर्यंत सरळ 12% खाली आली. फिलाडेल्फिया सेमीकंडक्टर इंडेक्सही तीन आठवड्यांत 13% घसरला, तर गुंतवणूकदारांच्या रिस्क क्षमता मोजणारा बिटकॉइन जवळपास 30% पडला.

AI संबंधित कंपन्यांमध्ये मागील दोन वर्षांत पैसा पाण्याप्रमाणे वाहिला. Nvidia जी काही वर्षांपूर्वी क्रिप्टो स्लोडाउनमुळे संघर्ष करणारी 300 अब्ज डॉलरची कंपनी होती ती आता जगातील सर्वात मौल्यवान कंपनीच्या शर्यतीत Apple आणि Microsoft च्या समोर उभी आहे. या तिन्ही कंपन्यांची एकत्रित मार्केट व्हॅल्यू सुमारे 12.3 ट्रिलियन डॉलर इतकी असून ती जपान, जर्मनी आणि भारताच्या अर्थव्यवस्थांच्या बेरीजपेक्षा जास्त आहे. पण तज्ज्ञांचे मत आहे की या वाढीचा पाया ‘प्रत्यक्ष नफा’ कमी आणि ‘मोठ्या वचनांवरची गुंतवणूक’ जास्त आहे.

बँक ऑफ इंग्लंडच्या अहवालानुसार S&P 500 मध्ये 2025 मधील जो तेजीचा ट्रेंड दिसला त्यातील जवळपास दोन-तृतीयांश वाढ फक्त AI कंपन्यांमुळे झाली. म्हणजे AI स्टॉक्स वगळले तर संपूर्ण रॅली जवळपास अदृश्य होते. Google चे सीईओ सुंदर पिचाईसुद्धा म्हणाले की “जर AI बबल फुटला तर कोणतीच कंपनी 100% सुरक्षित राहणार नाही.” मात्र तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे की, dot-com बबलसारखा इतिहास पुन्हा घडू शकतो, फरक फक्त एवढाच की यावेळी आकार पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी मोठा आहे.

याचदरम्यान महत्त्वाची बातमी समोर आली की Meta आता Nvidia च्या अतिमहागडा GPU चिप्सऐवजी Google च्या कमी खर्चिक TPU चिप्सकडे वळण्याचा विचार करत आहे. म्हणजेच मोठ्या टेक कंपन्यादेखील आंधळा खर्च कमी करण्याच्या तयारीत आहेत  ज्यामुळे बबल ओसरण्याची शक्यता आणखी वाढते आहे.

AI चा भविष्याबाबत प्रश्न आता ‘बबल फुटेल का?’ हा नाही तर ‘कधी फुटेल?’ आणि ‘त्याचे परिणाम किती व्यापक असतील?’ असा झाला आहे. सध्या छोटा गुंतवणूकदार मागे हटत असल्याची चिन्हे आहेत आणि अशा वेळी संस्थात्मक गुंतवणूकदारही सहसा सुरक्षित खेळायला सुरुवात करतात. त्यामुळे 12 ट्रिलियन डॉलरच्या AI बूमवर आता धोका निर्माण झाला असून गुंतवणूकदारांसाठी हा काळ सावधगिरीचा मानला जात आहे.


-------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने