मुंबई : महाराष्ट्रात बालकांमधील कुपोषणाची स्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे नवीन आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मेळघाटातील वाढत्या बालमृत्यूंवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्यानंतरही नंदुरबार, गडचिरोली, पालघर, धुळे आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील तब्बल ४५ टक्के मुले तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत आढळत असल्याने राज्यातील पोषणव्यवस्थेचे चित्र गंभीर आहे. मे महिन्यात ४४ टक्के, तर जून आणि जुलैमध्ये ४५ टक्के मुले तीव्र कुपोषित असल्याचे निष्पन्न झाले होते, तसेच २५ टक्के मुलांचे वजन अत्यंत कमी असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
ऑक्टोबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात ४६ टक्के मुले तीव्र कुपोषित गटात तर २५ टक्के मुले कमी वजनाची असल्याचे आढळले. नंदुरबारमध्ये जुलै ते ऑक्टोबर या काळात वाढ खुंटलेल्या मुलांची संख्या ६६ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून ४४ टक्के मुलांचे वजन कमी होते. मुंबईपासून जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातही परिस्थिती धोक्याच्या टप्प्यावर असून याच कालावधीत वाढ खुंटलेली मुले ४९ ते ५१ टक्के दरम्यान नोंदली गेली तर कमी वजनाची मुलांची संख्या २६ टक्के होती.
धुळे जिल्ह्यात वाढ खुंटलेली मुले ४३ टक्के आणि कमी वजनाची मुले २१ टक्के असल्याचे आकडे सांगतात. अशा मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका जास्त असल्याने त्यांना तातडीने पोषण आणि वैद्यकीय उपचार मिळणे अत्यावश्यक आहे. सप्टेंबर महिन्यात पोषण महिन्यानिमित्त राबवलेल्या उपक्रमांचा लाभ आदिवासी आणि दुर्गम भागातील बालकांपर्यंत कितपत पोहोचला, याबाबत तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तीव्र कुपोषित बालकांना योग्य आहार आणि वैद्यकीय देखरेखीने मध्यम कुपोषणातून बाहेर आणण्याची प्रक्रिया असली तरी पावसाळ्यातील रोगराई आणि साथींच्या उद्रेकामुळे ती मुले पुन्हा गंभीर श्रेणीत परत जातात, ही स्थिती रोखणे हे मुख्य आव्हान मानले जात आहे.
सर्वांसाठी एकसमान आराखडा परिणामकारक ठरू शकत नाही. बाळाच्या जन्मावेळी आईचे वजन, अनुवांशिक रोग, प्रसूतीकाळातील आजारपण, साथींचा प्रादुर्भाव यांसारख्या घटकांचा तपशीलवार विचार करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नमूद केले. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कुपोषण कमी झाल्याचा दावा आकडेवारीवरून दर्शवता येत नसून पोषण निकषांनुसार लोकसंख्येत किमान दोन टक्के कुपोषण अपेक्षित असते, मात्र वास्तव त्यापेक्षा कितीतरी पट गंभीर असल्याचे या स्पष्ट होताना दिसत आहे.
-------------------------------------------
