RPF पासून ALP पर्यंत पदांवर नियुक्ती
नवी दिल्ली : सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो युवकांसाठी भारतीय रेल्वेकडून मोठी आनंदवार्ता आली आहे. रेल्वेने 2024 व 2025 या वर्षांसाठी मिळून 1 लाख 20 हजार 579 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैषणव यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात माहिती देताना सांगितले की, या सर्व पदांसाठी भरती मोहीम जलद गतीने सुरू असून पात्र उमेदवारांना रेल्वेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
माहितीनुसार, वर्ष 2024 साठी रेल्वेकडून एकूण 10 भरती अधिसूचना जारी करण्यात आल्या असून त्याद्वारे 91,116 पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. तर वर्ष 2025 साठी 7 अधिसूचना काढण्यात आल्या असून त्याद्वारे 38,463 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. एकत्रित पाहता 1 लाख 20 हजार 579 पदांसाठी प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त जागांमध्ये RPF मधील उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल, सहाय्यक लोको पायलट, तंत्रज्ञ, ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट, केमिकल आणि मेटलर्जिक असिस्टंट, पॅरामेडिकल स्टाफ, NTPC, मिनिस्टीरियल आणि आयसोलेटेड कॅटेगरी तसेच लेव्हल-1 मधील ट्रॅक मेंटेनर आणि असिस्टंट यांसारख्या पदांचा समावेश आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी यावेळी हेही सांगितले की, मागील काही वर्षांत रेल्वेतील भरतीची गती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्ष 2004 ते 2014 दरम्यान रेल्वेत 4 लाखांना नोकरी मिळाली होती, तर 2014 ते 2025 या काळात 5.08 लाख उमेदवारांना रेल्वेत रोजगार मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन सरकार आल्यापासून नोकऱ्यांचा वेग वाढल्याचा दावा त्यांनी मांडला. तसेच रेल्वेने भरती कॅलेंडर देखील जारी केले असून यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. मेगा भरती जाहीर झाल्यानंतर तरुणांमध्ये रेल्वे नोकरीबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
---------------------------------------------
