‘शेजारधर्म आणि शेजाऱ्यांचे अधिकार’ परिसंवादातून सुरक्षितता, विश्वास आणि सौहार्द जपण्याचा संदेश !
छत्रपती संभाजीनगर : धकाधकीच्या आधुनिक जीवनशैलीत माणुसकी, संवाद आणि आपुलकीचे नाते क्षीण होत चालले आहे. बंद दरवाज्यांच्या आणि व्यस्त दिनचर्येमुळे शेजारपणाचा वारसा हरवत चालल्याच्या जाणीवेतून जमात-ए-इस्लामी हिंद यांच्या वतीने ‘शेजारधर्म आणि शेजाऱ्यांचे अधिकार’ या विषयावर नुकताच परिसंवाद आयोजित करण्यात आला. 21 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण देशभर सुरू असलेल्या मोहिमेचा हा एक भाग असून समाजातील एकोपा व सहजीवनाची भावना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहर अध्यक्षा शाइस्ता कादरी यांनी भूषविले. “शेजाऱ्यांशी नाते हे कोणत्याही औपचारिकतेवर नव्हे तर मानवी मूल्यांवर आधारित असते. घराजवळ राहणारी व्यक्ती कधी संकटात आधार बनते, कधी आपुलकीची जागा घेते. फक्त संवाद आणि जिव्हाळा टिकवण्याची गरज आहे,” असे त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
परिसंवादात बदलत्या काळामुळे शेजाऱ्यांमधील संवाद तुटत चालल्याचे आणि संवेदनशीलता कमी होत असल्याचे निरीक्षण व्यक्त झाले. पूर्वी शेजाऱ्यांच्या घरात दिवा लागला की आनंद वाटायचा, सण-समारंभ एकत्र साजरे व्हायचे, दुखः आणि संकटात मदतीला तत्पर हात उभे रहायचे; मात्र आज एकाच इमारतीत राहूनही लोकांना एकमेकांचे नाव माहिती नसणे ही चिंताजनक बाब असल्याचे मत मान्यवरांनी नोंदवले.
समाजातील सुरक्षितता, विश्वास आणि सौहार्द टिकवण्यासाठी शेजारधर्म हा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ असल्याचे उपस्थीतांनी नमूद केले. परस्पर संबंध दृढ झाले तर समाज अधिक सुरक्षित आणि संवेदनशील होऊ शकतो, तसेच व्यक्तिगत जीवनातील ताण कमी होण्यासही मदत होते, असा संदेश परिसंवादातून देण्यात आला.
जनसंपर्क सचिव फाहीमुनिसा, पत्रकार मोहसीना, तृप्ती डिग्गीकर, डॉ. आरती श्यामल जोशी, अर्चना जोशी, डॉ. संध्या मोहिते, ॲड. आशा गोरे, बबिता पाटणी यांसह इतर मान्यवरांनी सहभागी होऊन विषयावर आपली मते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी समाजात पुन्हा आपुलकी वाढवण्याचे, शेजाऱ्यांशी संवाद दृढ करण्याचे, परस्पर मदतीची भावना वाढीस लावण्याचे आणि शेजारधर्माला नवीन उर्जासह जपण्याचे सामूहिक आवाहन केले. बदलत्या काळात नात्यांची उणीव दूर करून मानवी मूल्यांना पुन्हा प्राधान्य देण्याचा प्रेरणादायी संदेश हा परिसंवाद देऊन गेला.
----------------------------------------------


