सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्यात बिळूर येथे प्रवचनादरम्यान लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाल्याने कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या विरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धर्माच्या आरक्षणासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून फिर्याद नोंदविण्यात आली असून फिर्यादी शंकरगौंड शिवनगौंड बिरादार यांनी तक्रार दिली आहे. कर्नाटकातील बसवन पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता आणि तो पुढील कारवाईसाठी जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कणेरी मठ परिसरासह सांगली आणि कर्नाटकातही मोठी चर्चा रंगली आहे.
या घडामोडीनंतर काडसिद्धेश्वर महाराजांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करत वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की प्रवचनात लिंगायत समाजाला तोडण्याच्या प्रयत्नांविरोधात कठोर भूमिका मांडली होती. “कर्नाटकात लिंगायत समाज तोडण्याचे महापाप लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहे.
हिंदू धर्म तोडण्याचे प्रयत्न प्रत्यक्षपणे सुरू होते म्हणून मी ‘असं करू नका’ एवढंच सांगितलं. संबंधित मंत्री आणि कर्नाटक सरकारने कुत्सितपणे तक्रार दाखल केली,” असे ते म्हणाले. पुढे त्यांनी हे गुन्हे राजकीय दबाव आणि सूडातून दाखल करण्यात आल्याचा दावा केला. “
समाज जोडण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, तोडण्यासाठी काहीही करावे लागत नाही. मी समाज एकजूट राहावा म्हणून सांगितलं, पण खोडसाळपणे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. यात केवळ राजकारण आहे,” असे महाराज म्हणाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ ऑक्टोबर रोजी बिळूर विरक्त मठात दिलेल्या प्रवचनात महाराजांनी कथितरित्या द्वेषभावना निर्माण करणारे, एकोप्याला धक्का पोहोचवणारे वक्तव्य केले अशी फिर्याद नमूद करण्यात आली आहे. तक्रार स्वीकारल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा जत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घडामोडीमुळे सामाजिक आणि धार्मिक पातळीवर वाद निर्माण झाला आहे.
काडसिद्धेश्वर महाराज हे १९८९ पासून कणेरी मठाचे मठाधिपती असून आरोग्य, शिक्षण, गावविकास आणि शेती क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आत्मनिर्भर समाजनिर्मितीचे कार्य त्यांनी केले आहे. १९९१ पासून समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठी काम करण्याचा संकल्प त्यांनी स्वीकारला असून कणेरी ग्रामविकासाची जबाबदारी स्वीकारून तरुणांनी सरकारकडे पाहण्यापेक्षा स्वतः गावाच्या विकासात पुढाकार घ्यावा, अशी प्रेरणा त्यांनी दिली आहे. श्रद्धास्थान असलेल्या या महत्त्वाच्या धार्मिक व्यक्तिमत्वावर गुन्हा दाखल झाल्याने अनुयायी आणि विरोधकांमध्येही जोरदार चर्चेला सुरुवात झाली असून आगामी कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—----------
