बॉलीवूड हादरले, 200 कोटीचे आमिष दाखवत फसवणूक !

 


सुप्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्टला पत्नीसह नाट्यमय अटक 


मुंबई : बॉलिवूडमध्ये खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना राजस्थान पोलिसांनी मुंबईतील यारी रोड परिसरातून नाट्यमय कारवाई करत अटक केली. राजस्थान पोलिसांच्या पथकाला वर्सोवा पोलिसांनी मदत केली असून ज्या गंगा भवन अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली ते त्यांच्या मेहुणीचे घर असल्याची माहिती समोर आली आहे. अटकेनंतर पोलिसांनी वांद्रे न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज दाखल केला असून चौकशीसाठी दोघांना उदयपूरला नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईनंतर संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे.


डॉ. अजय मुरडिया नावाच्या उदयपूर येथील उद्योजक आणि आयव्हीएफ हॉस्पिटलचे संस्थापक यांनी विक्रम भट्ट आणि इतर सहा ते सात जणांविरुद्ध १७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. आरोपानुसार डॉक्टरांच्या पत्नीच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करण्याच्या नावाखाली भट्ट यांनी मोठ्या नफ्याचे आश्वासन देत निधी गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर चित्रपटाच्या कामासाठी विविध खर्च, निर्मितीची कामे, प्रकल्पाच्या टप्प्यांकरिता आवश्यक आर्थिक देयकांचे कारण देत सातत्याने पैशांची मागणी केली गेली. पुढे तपासात हे सर्व प्रकरण पूर्णपणे फसवणुकीचे असल्याचे उघड झाले आणि डॉक्टरांकडून एकूण तब्बल ३० कोटी रुपये उकळले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या प्रकल्पासाठी ज्याच्या नावाने कंपनी दाखवण्यात आली ती प्रत्यक्षात श्वेतांबरी भट्ट यांच्या नावाने नोंदणीकृत VSP LLP असल्याचे आढळून आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी विक्रम भट्ट, श्वेतांबरी भट्ट आणि इतर आरोपींविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली होती आणि ८ डिसेंबरपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आरोपींनी समन्सची दखल न घेतल्यामुळे थेट अटक मोहीम राबविण्यात आली. विक्रम भट्ट यांनी आरोप खोटे असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत FIR भ्रामक असल्याचा दावा केला आहे.


गुन्हा, लूकआउट नोटीस आणि नंतर अटक या तिहेरी टप्प्यात घडलेल्या घडामोडींमुळे बॉलिवूडमध्ये मोठ्या चर्चांना ऊत आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकावरील फसवणुकीच्या कारवाईमुळे चित्रपटसृष्टी, व्यावसायिक वर्तुळ आणि चाहत्यांमध्ये आश्चर्य व धक्का दोन्ही निर्माण झाले आहेत. आता पुढील कारवाई आणि कोर्टात होणारी सुनावणीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.


________







Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने