भावाचा इशारा पाळला नाही, सहा जणांनी केले २९ वार
पुणे: येरवडा परिसरात प्रेमसंबंधात रागाने आणि सूडाने एका १८ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृताला उद्यानात बोलावून सहा जणांनी मिळून धारदार शस्त्रांनी तब्बल २९ वार करत निःपात केला. या खून प्रकरणाने पुणे शहर हादरले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. मृताचे नाव लखन ऊर्फ सोन्या बाळू सकट (वय १८, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे आहे. या प्रकरणी केशव बबन वाघमारे यांनी फिर्याद दाखल केली असून चंदननगर पोलिसांनी अल्पावधीत प्रभावी तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिस तपासानुसार, मृत लखनच्या मावसबहिणीशी आरोपी यश गायकवाड याचे प्रेमसंबंध होते. ‘माझ्या बहिणीपासून दूर राहा आणि संबंध तोड’ असा इशारा लखन सातत्याने यशला देत होता. याच कारणावरून दोघांत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. शनिवारी ६ डिसेंबर रोजी पुन्हा याच विषयावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर आरोपी यश प्रचंड रागात होता. रात्री यशने ‘भांडण मिटवण्यासाठी’ असे सांगत लखनला चंदननगर येथील ऑक्सिजन पार्क उद्यानात बोलावले. लखन तेथे पोहोचताच यश, प्रथमेश दारकू आणि जानकीराम वाघमारे यांनी त्याला अचानक वेढा घालत धारदार शस्त्रांनी सलग २९ वार केले. जागीच मृत्यू झाल्यानंतर आरोपी पळून गेले.
घटनास्थळी रक्ताचा सडा आढळूनही मृतदेह गायब असल्याने पोलिसांना सुरुवातीला मोठे आव्हान उभे ठाकले. विविध रुग्णालयांशी संपर्क साधल्यावर लखन एका खासगी रुग्णालयात असल्याचे समोर आले. तातडीने तपास वाढवत पोलिसांनी सहा तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणात प्रथमेश दारकू (२०), यश गायकवाड (१९), जानकीराम वाघमारे (१८), महादेव गंगासागरे (१९), बालाजी आनंद (१९) आणि करण सरवदे (१८) यांना अटक करण्यात आली असून सहा अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेगारी व प्रेमसंबंधांना जोडलेला हा खून अत्यंत क्रूर स्वरूपाचा असल्याने शहरभरात संताप आणि चिंतेची भावना व्यक्त होत असून तरुणांमध्ये वाढती हिंसक प्रवृत्ती ही गंभीर सामाजिक समस्या बनत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पुढील तपास सुरू आहे.
----------
