सामाजिक न्यायाच्या लढ्याचे युग संपले
पुणे : सामाजिक परिवर्तन, श्रमिक हक्क आणि समानतेचा संघर्ष यांचे पर्याय बनलेले ज्येष्ठ समाजसेवक, शेतकरी-कामगार नेते आणि गांधीवादी विचारांचे प्रखर पुरस्कर्ते बाबा आढाव यांचे आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी पुण्यात निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वस्थ असलेल्या आढाव यांना गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुणे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते, मात्र प्रकृती गंभीर होत गेली आणि अखेर आयसीयूतील उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांसाठी आयुष्य झोकून देणारी एक ठाम आवाजाची परंपरा संपुष्टात आल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
1950 च्या दशकापासूनच सामाजिक संघर्ष, चळवळ आणि संघटनात्मक शक्तीची चिरंतन ओळख बनलेले बाबा आढाव म्हणजे गरीबांसाठी, हमालांसाठी, तळागाळातील वंचितांसाठी हक्क मिळवून देणारा अखंड लढा. 1952 च्या दुष्काळात धान्यटंचाईविरोधात सत्याग्रह करून त्यांनी सार्वजनिक संघर्षाची सुरुवात केली आणि लवकरच मजुरांच्या शोषणाविरुद्ध आयुष्य झोकून देण्याचा निर्धार केला. 1955 मध्ये स्थापन केलेली हमाल पंचायत ही असंघटित कामगारांना संघटित करण्याचा राष्ट्रीय प्रयोग होती. दोन दशकांच्या लढ्यातून अखेर 1969 साली ‘महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि असंघटित कामगार कायदा’ लागू झाला आणि देशातील असंघटित कामगारांच्या संरक्षणाचा पहिला ऐतिहासिक कायदा म्हणून या लढ्याची नोंद झाली. हमाल पंचायतीतून मोफत निवास, वैद्यकीय सेवा, शाळा, अन्नपुरवठा यासारखे कल्याणकारी उपक्रम राबवून त्यांनी संघटना म्हणजे केवळ आंदोलन नव्हे तर विकासाचे मॉडेल हे सिद्ध केले.
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबर 1974 रोजी सुरू झालेली ‘कष्टाची भाकर’ योजना ही मजुरांसाठी पौष्टिक अन्न स्वस्त दरात उपलब्ध करून देणारी सामाजिक क्रांती मानली गेली. ग्रामीण समतेच्या दिशेने मोठा झेंडा रोवताना ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ राबवून त्यांनी दलितांना सार्वजनिक पाण्याचा अधिकार मिळवून दिला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक संरचनेत निर्णायक बदल घडवले. सत्यशोधक आणि समाजवादी तत्त्वज्ञान अंगीकारत त्यांनी अंधश्रद्धाविरोधी चळवळ, मानवी सन्मान, श्रमाचे मूल्य आणि जातिविरोधी भूमिका यात कोणतीही तडजोड कधीही केली नाही.
शेवटच्या श्वासापर्यंत संघर्षाची धार कायम ठेवणारे बाबा आढाव 93 व्या वर्षीही लढ्याच्या रस्त्यावर होते. “सत्तेची भूक माणसाला सकाळी कुठे आणि संध्याकाळी कुठे घेऊन जाते, पण अंतिम निर्णय 140 कोटी जनता घेते,” असे म्हणत राष्ट्रवादीतील फुटीनंतर देशातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी परखड भाष्य केले होते. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरची मागणी, मजुरांच्या हक्कांवरील धोके, लोकशाही मूल्यांचे रक्षण या सर्व प्रश्नांवर ते शेवटपर्यंत लढत राहिले.
बाबा पांडुरंग आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात झाला. पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असूनही विचारांनी आणि कामाने ते पूर्णपणे समाजवादी होते. राष्ट्र सेवा दलाशी जोडलेली त्यांची सुरुवातीची ओळख पुढे ठाम तत्त्व, अहिंसा, समता आणि परिवर्तनाच्या चळवळीचे आयुष्यभर टिकलेले मूळ बनली. ते स्वतः एक नेता नसून एक संस्था होते हे समाजाने वारंवार अनुभवले.
त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रात असंघटित मजुरांच्या संघर्षाशी, श्रमिक संघटनांच्या प्रवासाशी, जातिभेदाविरुद्धच्या लढ्याशी, गांधीवादी मूल्यांशी आणि समाजवादी तत्त्वांशी नाळ असलेले एक युग संपले आहे. मात्र त्यांनी पेटवलेला विचारांचा दिवा आणि दुर्बलासाठी ताठ उभे राहण्याची परंपरा पुढील पिढ्यांना नवनव्या संघर्षाकडे नेऊन ठेवेल यात शंका नाही. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 10 वाजता मार्केटयार्ड येथील हमाल भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहेत.
------
/
