विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटात संघर्ष, आमदार थोडाफोडीच्या चर्चेने तापले वातावरण!

 

नागपूर : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची आज नागपुरात सुरुवात होताच राज्यातील राजकीय तापमान अक्षरशः उकळू लागले. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अजूनही अनिश्चित असताना ठाकरे गटातच अंतर्गत संघर्ष तीव्र झाल्याची चर्चा जोर धरत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या पदासाठी अग्रस्थानी असलेले अनुभवी आमदार भास्कर जाधव यांना डावलून थेट आदित्य ठाकरे यांच्या नावाला गती मिळत असल्याने ठाकरे गटात असंतोषाची ठिणगी पडल्याचे संकेत राजकीय वर्तुळात मिळत आहेत. सूत्रांनुसार उद्धव ठाकरे स्वतः आदित्य यांचे नाव अंतिम करण्यासाठी सक्रिय असल्याची माहिती असून, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त झाली. 

दरम्यान भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के सदस्यसंख्येची अट असल्याचा सरकारी दावा खोटा असल्याची टीका करत सरकार व सचिवालय दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. “मी आक्रमक आहे म्हणून पद न दिल्यास याचा अर्थ मला घाबरतात,” असे जाधवांनी थेट विधानसभेत स्पष्ट केले.

अधिवेशनाचा कालावधी केवळ १४ डिसेंबरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आल्यानंतर विरोधकांनी पहिल्याच दिवशी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जाधव आणि नाना पटोले यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करत सरकार विदर्भाला अन्याय करत असल्याचा आरोप केला. त्यावर पलटवार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आचारसंहितेमुळे आणि संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालावधी कमी ठेवावा लागला आहे. “अधिवेशन जास्त चालावे ही आमचीही इच्छा आहे. नागपूर अधिवेशन सर्वाधिक माझ्याच काळात झाले आहे आणि पुढेही होईल,” असे ते म्हणाले. शिवाय पटोले यांच्या मागणीवर हल्ला चढवत त्यांनी आठवण करून दिली की “ते अध्यक्ष असताना मुंबईतील अधिवेशने ३ आणि ५ दिवसांची होती, तेव्हा बाकी राज्यांत १५- २० दिवस अधिवेशने चालू होती. तेव्हा कोरोनाचा धोका नव्हता का?”

या तापलेल्या वातावरणात आदित्य ठाकरे यांनी शिंदे सेनेचे तब्बल २२ आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा करताच राजकीय वाद उंची वर पोहोचला. यावर फडणवीसांनी अत्यंत तीव्र पलटवार केला. “फक्त बोलण्याने गोष्ट खरी होत नाही. उद्या कोणी म्हणेल की आदित्य ठाकरे यांच्या २० आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला. मग तेही आपण मानायचं का?” असे फडणवीस म्हणाले. “शिंदे सेना आमचा मित्र पक्ष आहे आणि आम्हाला त्यांच्या आमदारांना घेऊन काय करायचं आहे? उलट शिवसेना मजबूत व्हावी म्हणूनच आम्ही सोबत उभे आहोत,” असे ते पुढे म्हणाले.  ‘वंदे मातरम्’ वर लोकसभेत झालेल्या चर्चेतही त्यांनी आदित्य ठाकरे व काँग्रेसवर सडेतोड हल्ला चढवत “वंदे मातरम वर कधी बंधन आले तर त्यासाठी काँग्रेस जबाबदार,” असे ठामपणे स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय, अधिवेशनाचा कालावधी, शिंदे सेनेच्या आमदार फोडाफोडीच्या चर्चा आणि वंदे मातरम् वाद या सर्व मुद्द्यांमुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील राजकारण स्फोटक वळणावर पोहोचले. ठाकरे गटाने आरोप फेटाळले असले तरी अनुभवी भास्कर जाधवांना संधी मिळणार की युवा आदित्य ठाकरे यांच्यावर ठाम बाजी लावली जाणार, विरोधक अधिवेशन विस्तारासाठी सरकारला कोंडीत पकडतील की सत्ताधारी पलटवारात वरचढ ठरतील, आणि शिवसेना–भाजप समीकरणांमध्ये पुढील काही दिवसांत कोणती नवी घडामोड घडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


--------








Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने