देशभरातील विमानसेवेवर गंभीर परिणाम
नवी दिल्ली/पुणे : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या ‘इंडिगो’च्या वेळापत्रकातील सततच्या बिघाडामुळे प्रवाशांचे हाल सुरूच असून, त्याचा थेट परिणाम इतर विमान कंपन्यांच्या भाडेवाढीत दिसत आहे. पुणे-मुंबई विमान प्रवासाचे तिकीट एअर इंडियाकडून तब्बल १ लाख रुपयांवर पोहोचले असून, नागपूर- मुंबई उड्डाणासाठी ३० हजारांहून अधिक रक्कम आकारली जात आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, नागपूर आणि इतर प्रमुख मार्गांवरील भाडे अनेक पटींनी वाढल्याने प्रवासी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या उड्डाणांमध्ये मोठ्या प्रमाणात रद्दीकरणे व उशीर सुरू आहे. फक्त पुणे विमानतळावरील इंडिगोची ४६ उड्डाणे रद्द करण्यात आली असून, अनेक प्रवाशांना विमानतळावर दोन-दोन दिवस अडकून राहावे लागत आहे. काहींचे सामान पुढे गेले तर प्रवासी मागे राहिल्याच्या तक्रारी नोंदल्या जात आहेत. अनेकांचे महत्त्वाचे काम, ट्रिप, मिटिंग्ज आणि वैयक्तिक नियोजन कोलमडले असून, हॉटेलमध्ये राहण्यावर, खाण्यावर आणि स्थानिक प्रवासावरही अतिरिक्त खर्च होत आहे. इंडिगोव्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या तिकिटांच्या दरात मोठी वाढ झाल्याने गोंधळ अधिकच वाढला आहे.
परिस्थिती हाताळण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि ‘डीजीसीए’ने हस्तक्षेप केला असून, ‘एफडीटीएल’ (Flight Duty Time Limitations) नियमांच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु वैमानिक संघटना ‘एएलपीए इंडिया’ने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत सरकारवर व विमानतळ सुरक्षेच्या नियमांना कमकुवत करण्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी इंडिगोने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे सेवा विस्कळीत झाल्याचे कारण पुन्हा पुढे केले व पुढील १०-१५ डिसेंबरदरम्यान सेवा पूर्ववत होण्याचा दावा केला. मात्र तिकिटदरातील अतिवाढ आणि सतत रद्द होणारी उड्डाणे यामुळे प्रवाशांचा संयम तुटला असून पुणे विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी आंदोलनही झाले.
सरकारने चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे उड्डाण रद्द झाले आहे त्यांचा परतावा तत्काळ दिला जाईल, असे इंडिगोकडून जाहीर करण्यात आले आहे. तरीही प्रवाशांचा अविश्वास वाढत चालला असून, आणखी आठवडाभर विमानसेवा विस्कळीत राहण्याची शक्यता इंडिगोच्या विधानांवरून व्यक्त होत आहे. सध्या परिस्थितीचा फटका कुठल्याही विमान कंपनीच्या तिकीट आरक्षणावर बसत असून, देशांतर्गत विमान प्रवास सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
--------------------------------------------------
