आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर मित्रांची संख्या, फॉलोअर्स, लाईक्स आणि कमेंट्स यांचा मारा दिसतो. वरवर पाहता अनेकांचे सामाजिक आयुष्य अत्यंत गजबजलेले भासते. मात्र या डिजिटल गर्दीमागे दडलेले एकटेपण, म्हणजेच ‘सायलेंट लोनलीनेस’, हे वास्तव आता एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. न्यूज कॉर्पच्या ‘ग्रोथ डिस्टिलरी’ आणि मेडिबँकने केलेल्या संयुक्त अभ्यासात हे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.
या अहवालानुसार, ज्या लोकांची मानसिक स्थिती स्थिर आणि सकारात्मक आहे, त्यांच्याकडे सरासरी पाच किंवा त्याहून अधिक सच्चे मित्र असतात. याउलट, जे लोक मानसिक संघर्षातून जात आहेत, त्यांच्याकडे सरासरी फक्त तीन मित्र आढळतात. वरवर किरकोळ वाटणारी ही दोन मित्रांची तफावत प्रत्यक्षात मोठा मानसिक फरक निर्माण करते. ‘मी परिस्थिती हाताळू शकतो’ या आत्मविश्वासातून ‘इतरांना त्रास नको म्हणून मी शांत राहतो’ या अवस्थेपर्यंतची ही घसरण अनेकांच्या आयुष्यात नकळत घडत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
आजची सोशल लाइफ सतत बिझी दिसते. कार्यक्रमांना हजेरी, ग्रुप चॅट्समधील सक्रिय सहभाग, शेकडो ऑनलाइन मित्र हे सगळे असूनही, संकटाच्या वेळी अनेक जण कुणालाही फोन करण्याचं टाळतात. कारण आपली समस्या सांगून आपण ओझं ठरू नये, किंवा आपली कमजोरी इतरांना दिसू नये, ही भीती मनात असते. त्यामुळे कुणी विचारलेच तर ‘थोडे थकलोय’ किंवा ‘खूप बिझी आहे’ अशी वरवरची उत्तरं दिली जातात, पण प्रत्यक्षात आतून प्रचंड थकवा आणि एकटेपणाची भावना असते.
अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे की, खरे नाते म्हणजे ५० किंवा १०० मित्रांची यादी नव्हे. खरे नाते म्हणजे असा एक व्यक्ती, जो निःसंकोचपणे तुमचा फोन उचलेल, तुमच्या अडचणीत धावून येईल आणि ज्याच्यासाठी तुम्हीही वेळ, परिस्थिती न पाहता उभे राहाल. मानसिक आधारासाठी नेहमीच थेरपिस्ट किंवा तज्ज्ञ असणे गरजेचे नसते, तर अनेकदा एक सच्चा मित्रही पुरेसा ठरतो, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
सतत ऑनलाइन असूनही संकटाच्या क्षणी आपण नेमका कुणाला फोन करतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. शेवटी आयुष्यात शेकडो ओळखीपेक्षा पाच विश्वासू मित्र अधिक मोलाचे ठरतात. हेच मित्र अडीअडचणीला धावून येतात आणि आयुष्यात भावनिक सुरक्षिततेचा मजबूत आधार देतात. डिजिटल प्लॅटफॉर्मवर नाती जुळवताना हा अहवाल एक महत्त्वाची आठवण करून देतो की, खरी मैत्री इमोजी, मीम्स किंवा लाईक्समध्ये नसून, कठीण प्रसंगी मिळणाऱ्या निःस्वार्थ साथीत असते.
