डिजिटल अरेस्टच्या नावाखाली देशभरात सायबर ठगांनी सामान्य नागरिक, डॉक्टर, निवृत्त अधिकारी यांना मानसिक कैदेत ठेवून कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. धक्कादायक प्रकरणांचा सविस्तर आढावा.
मुंबई: देशात सायबर गुन्हेगारीने आता केवळ आर्थिक फसवणुकीपुरती मर्यादा ओलांडली असून ती थेट माणसाच्या मानसिक आरोग्यावर आणि जीवावर बेतू लागली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ या नव्या संकल्पनेच्या माध्यमातून सायबर ठग नागरिकांना फोन आणि व्हिडीओ कॉलद्वारे भीती, दबाव आणि भ्रमाच्या जाळ्यात अडकवत आहेत. या भयानक खेळात कोट्यवधी रुपयांची लूट तर होत आहेच, पण अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
या सायबर ठगीचे सर्वात धक्कादायक प्रकरण पंजाबमधून समोर आले आहे. 29 वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहिलेले, अमृतसरचे माजी पोलीस आयुक्त आणि पटियाला व फिरोजपूर रेंजचे डीआयजी राहिलेले माजी आयपीएस अधिकारी अमर सिंह चहल हे स्वतः या ठगांच्या जाळ्यात अडकले. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्याकडून तब्बल 8 कोटी 10 लाख रुपयांची रक्कम उकळली. या आर्थिक नुकसानाचा आणि मानसिक धक्क्याचा ताण सहन न झाल्याने त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी डीजीपींच्या नावाने 12 पानांचे सविस्तर निवेदन लिहून या कटाची माहिती दिली आहे. सध्या ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील रमेश चंद्र या वृद्धाची कहाणीही तितकीच अंगावर काटा आणणारी आहे. डायलिसिसवर असलेल्या या वृद्धाला तब्बल 70 दिवस त्यांच्या घरातील एका छोट्याशा खोलीत ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवण्यात आले. सायबर ठगांनी व्हिडीओ कॉलवर सीबीआय अधिकारी आणि न्यायाधीश असल्याचे भासवून त्यांना धमकावले. आधार कार्डच्या गैरवापराचा आरोप करत त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईतील 53 लाख रुपये खात्यांत ट्रान्सफर करून घेतले. आज उपचारांसाठी त्यांना नातेवाइकांकडून कर्ज घ्यावे लागत असून, स्थानिक पोलिसांकडून वेळेत मदत न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बिहारची राजधानी पटना येथेही असाच प्रकार घडला. एका निवृत्त डॉक्टर दाम्पत्याला दूरसंचार मंत्रालयाच्या नावाने फोन करून मुंबईत त्यांच्या नावाने बनावट सिम वापरली जात असल्याचे सांगण्यात आले. अनेक दिवस व्हिडीओ कॉलद्वारे त्यांना सतत नजरकैदेत ठेवले गेले. भीतीच्या वातावरणात या दाम्पत्याने 2 कोटी 30 लाख रुपये गमावले. स्वतः डॉक्टर असलेला मुलगा दिल्लीतील मोठ्या रुग्णालयात कार्यरत असतानाही, भीतीपोटी त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला नाही.
अशाच घटना मुंबई, पुणे, चंदीगड, दिल्ली, अहमदाबादसह देशातील विविध शहरांत घडल्या आहेत. कुठे वृद्ध महिलेला अटक आणि नोकरी जाण्याची धमकी देण्यात आली, तर कुठे तासन्तास ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवून लाखो रुपये उकळण्यात आले. या सगळ्या प्रकरणांत सायबर गुन्हेगारांचे जाळे देशभर पसरल्याचे स्पष्ट होते.
या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेच्या संथ कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक पीडितांचे म्हणणे आहे की, तक्रार नोंदवण्यासाठीही त्यांना हेलपाटे मारावे लागतात. तपास अधिकाऱ्यांनी या संदर्भात सांगितले की, फसवणूक झाल्यास पहिला एक तास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे. त्वरित 1930 या सरकारी हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास व्यवहार थांबवून रक्कम गोठवण्याची शक्यता असते.
सायबर तज्ज्ञ आणि पोलिसांकडून एकच आवाहन करण्यात येत आहे की, कोणतीही सरकारी यंत्रणा फोन किंवा व्हिडीओ कॉलवरून अटक करत नाही किंवा चौकशीच्या नावाखाली पैसे मागत नाही. अनोळखी कॉलवर भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्वरित कॉल कट करून जवळच्या पोलिसांशी संपर्क साधणे आणि कुटुंबीयांना माहिती देणे हाच या डिजिटल सापळ्यापासून वाचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
---------------------------------------------------
