महिलांच्या पर्स चोरी उघड, प्रियकरासह टोळीचा पर्दाफाश
अहिल्यानगर : बस प्रवासादरम्यान महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या जोडप्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करण्यात यश मिळवले असून या गुन्ह्यात पकडलेली कोमल काळे ही सोशल मीडियावर तब्बल 50 हजार फॉलोअर्स असलेली रील स्टार असल्याचे उघड झाले आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्स चोरी करून त्यातील दागिने, मोबाईल आणि रोकड लांबविण्याचे काम हे जोडपे दीर्घकाळापासून करत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
गुन्हे शाखेचे पथक पाथर्डी बसस्थानक परिसरात गुप्त माहितीच्या आधारे कोमल काळेला ताब्यात घेतले असता चौकशीत तिने चोरलेले साहित्य आपल्या प्रियकर सुजित चौधरी याच्याकडे दिल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत सुजितला शेवगाव येथून अटक करण्यात आली.
त्यानंतर तपास अधिक होत असताना या जोडप्याकडून तब्बल नऊ लाख पंचेतीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यात साडेसहा तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांहून अधिक किमतीचा आयफोन 17 प्रो मॅक्स, विविध मोबाईल फोन आणि रोकड यांचा समावेश आहे. आतापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या बस चोरीच्या घटनांमध्ये ही टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
सोशल मीडियावर लोकप्रियता मिळाल्यानंतर गुन्हेगारीकडे वळलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संतापाची भावना पसरली असून बस प्रवासादरम्यान महिलांनी पर्स, मोबाईल व मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
-----------
