पुतिनसाठी आज पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ‘हाय डिनर’

वाढती मैत्री चर्चेत, अमेरिका-युरोपची घडामोडींवर नजर !

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय राजकीय भेटीसाठी आज भारतात येत असून त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी वैयक्तिक हाय डिनरची मेजवानी देणार आहेत. पुतिन आणि मोदी यांची वाढती जवळीक जगाच्या  नजरेत मोठ्या चर्चेचा विषय ठरत असून विशेषतः अमेरिका आणि युरोप या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीबाबत स्पष्ट अस्वस्थता व्यक्त करत आहेत. पुतिनची भारत भेट अशा वेळी होत आहे, जेव्हा भारत-अमेरिका संबंध तणावपूर्ण स्थितीत असून त्यामुळे हा दौरा भारत-रशिया सामरिक आणि आर्थिक सहकार्यासाठी अत्यंत निर्णायक मानला जात आहे. 

पुतिन 4-5 डिसेंबर रोजी 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत विस्तृत द्विपक्षीय चर्चा करायची असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पश्चिमी देशांनी रशिया आणि भारतावर लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवरही पुतिनचा दौरा आणि रशियाकडून भारताचा मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा खरेदी व्यवहार कायम असणे, दोन्ही देशांतील दृढ मैत्रीचे संकेत मानले जात आहेत.

पुतिनचे विमान गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नवी दिल्लीत उतरल्यावर मोदींकडील हाय डिनर कार्यक्रम पार पडेल. याआधी जुलै 2024 मधील मॉस्को दौऱ्यादरम्यान पुतिन यांनीही मोदींच्या सन्मानार्थ याच प्रकारची मेजवानी दिली होती. शुक्रवारी सकाळी राष्ट्रपती भवनात पुतिन यांचे औपचारिक स्वागत होईल, त्यानंतर ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतील. दुपारी 11 वाजता पुतिन आणि मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय शिखर बैठक होणार असून यामध्ये संरक्षण सहकार्याचा विस्तार, जागतिक दबावांपासून द्विपक्षीय व्यापाराचे संरक्षण, ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आणि लहान मॉड्यूलर न्यूक्लिअर रिऍक्टर तंत्रज्ञानात भागीदारी हे प्रमुख मुद्दे असतील. 

बैठकीनंतर दोन्ही नेते भारत मंडपम येथे उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधतील. तसेच पुतिन रशिया टुडेच्या भारतीय चॅनेलचे उद्घाटन करणार असून यासाठी रशियाने 100 सदस्यीय ब्यूरोची स्थापना केली आहे. सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुतिन यांच्या सन्मानार्थ राजकीय भोज देणार आहेत आणि त्यानंतर  शुक्रवार रात्री साडेनऊच्या सुमारास पुतिन मॉस्कोला परत जाणार आहेत.

शिखर बैठकीत संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार संतुलन यांवर सर्वाधिक भर दिला जाणार असून भारताकडून रशियाकडील मोठ्या कच्च्या तेल खरेदीमुळे वाढत असलेल्या व्यापार तफावतीचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. रशियन प्रवक्त्यांच्या मते, पश्चिमी निर्बंधांमुळे तेल पुरवठ्यात काही काळ अस्थिरता येऊ शकते, परंतु त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. औषधनिर्मिती, कृषी, खाद्य उत्पादन व ग्राहक वस्तु क्षेत्रात भारतीय निर्यातीचे प्रमाण वाढविणे तसेच खत पुरवठ्यासंदर्भात सहकार्य मजबूत करणे हे देखील चर्चेचा भाग असणार आहे. 

यासोबतच भारतीय नागरिकांच्या रोजगार व स्थलांतर प्रक्रियेला सुलभ करण्यासंबंधी करार आणि संरक्षण सहकार्यासंदर्भातील अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा असून युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत मुक्त व्यापार कराराच्या अंतिम टप्प्यावरील निर्णय हा द्विपक्षीय व्यापाराला 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 

दौऱ्याच्या आधी गुरुवारी संरक्षणमंत्र्यांची बैठक होणार असून एस-400 क्षेपणास्त्र खरेदी, सुखोई-30 उन्नयन, सु-57 फायटर जेट पुरवठा आणि लष्करी सामग्रीच्या जलद वितरणाच्या मागण्या भारतीय अजेंड्यावर असतील.


---------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने