आर्थिक तणाव वाढणार, महागाईचा धोका गंभीर
नवी दिल्ली : भारतीय रुपयाने बुधवारी व्यवहार सत्राच्या सुरुवातीलाच ऐतिहासिक घसरण नोंदवत डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ₹90 चा स्तर ओलांडला आणि काही क्षणांतच ₹90.14 च्या तळाची नोंद केली. सकाळी रुपया ₹89.97 वर उघडला होता; परंतु डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे घसरण वेगाने झाली. दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार करारात होत असलेल्या विलंबामुळे चलन बाजारात अविश्वासाचे वातावरण अधिक तीव्र झाले असून रुपयावरील दबाव वाढला आहे.
काही एक्सचेंज डीलर्सच्या मतानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केला असावा, तरीही बाजारातील गती यावर नियंत्रण आणण्यास अपुरी ठरली आहे. सध्याचा तांत्रिक सपोर्ट ₹90.20 असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी येथून रुपया आणखी खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2025 हे वर्ष रुपयासाठी आतापर्यंत अत्यंत प्रतिकूल ठरले आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन सुमारे 5 टक्क्यांपर्यंत घसरले असून आयात मिश्र अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट आघात होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. रुपया कमजोर झाल्यानंतर महागाई वाढण्याचा धोका सर्वाधिक गडद असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण भारतातील पेट्रोलियम गरजांपैकी जवळपास 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. रुपया पडला की तेल खरेदीसाठी अधिक डॉलर खर्चावे लागतात आणि त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतात. यातून ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक्सचे दर वाढतात व आयात वस्तू महाग होतात.
याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहक, लघु-उद्योजक, उत्पादन क्षेत्र आणि रोजगार बाजार सर्वांवर जाणवू शकतो. आगामी काही महिन्यांत जागतिक परिस्थितीत सुधारणा न झाल्यास रुपया ₹91–₹92 च्या दिशेनेही सरकण्याची शक्यता आर्थिक तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे सरकार आणि रिझर्व्ह बँक पुढील हस्तक्षेप कोणत्या पातळीवर करतात याकडे उद्योगमंडळ आणि बाजाराची नजर लागलेली आहे.
--------
