पतीच्या खात्यात पैसे येताच प्रियकरासोबत पळालेली पत्नी परतली !

नवी दिल्ली : नाती  अनेक कारणांनी…मोडतात पण काही वेळा नात्यांना पुन्हा जोडणारी गोष्ट मनापेक्षा जास्त मजबूत असते पैसा. झांसीच्या रक्सा परिसरात आता अशीच एक अजब गोष्ट घडली आहे. पाच वर्षांपूर्वी प्रेमीसोबत आयुष्य घडवण्यासाठी संसार सोडून गेलेली बायको परत आली आहे. प्रेमासाठी नाही… आठवणीसाठी नाही… माफीसाठी नाही… तर पतीच्या खात्यात जमा झालेल्या ५० लाखांच्या मोबदल्यात हिस्सा मागण्यासाठी.

इमलिया गावातील सुरेंद्र अहिरवार यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. पहिली काही वर्षं नवरा – बायकोचा संसार सुरळीत चालला. मुलगा झाला आणि घरात सगळं सुरेख होतं. पण 2020 मध्ये चित्र अचानक उलटलं. पत्नी एका नात्यात गुंतली आणि एका दिवशी मुलाला घेऊन थेट बहिणीच्या पतीसोबत (जीजासोबत) राहायला गेली. सुरेंद्रची दोन वर्षे समजावणी, पंचायती, नातेवाईकांची मध्यस्थी  काहीही उपयोग झाला नाही. अखेर 2022 मध्ये सुरेंद्रने दुसरा विवाह केला आणि आयुष्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

पण काही महिन्यांपूर्वी गावाची जमीन बीडा प्रकल्पात गेल्यानंतर कुटुंबाला सुमारे ५० लाखांचा मोबदला मंजूर झाला. यातील २० लाख रुपये नुकतेच सुरेंद्रच्या खात्यात जमा झाले… आणि इथूनच नाटकाची दुसरी इनिंग सुरू झाली.

रकमेची माहिती कळताच पाच वर्षांपासून प्रेमीसोबत राहत असलेली पहिली पत्नी अनाहूतपणे घरी धडकली. आग्रह एकच “मला आणि मुलाला तीसरा हिस्सा द्या.” मुलाच्या नावावर आठ लाख रुपये बँकेत जमा करावेत आणि उरलेल्या मोबदल्यातून हिस्सा द्यावा, असा तिचा हट्ट.

दुसरी पत्नी यावर तडक विरोधात उभी राहिली. घरात मोठा वाद पेटला आणि शेवटी सगळ्यांना पोलीस स्टेशनचा रस्ता धरावा लागला. रक्सा ठाण्यात दोन दिवस सलग पंचायत बसली पण निर्णय निघाला नाही. पत्नी पैसा न मिळाल्यास एफआयआरची धमकी, तर पतीची भूमिका स्पष्ट  पाच वर्षे घर सोडून दुसऱ्यासोबत राहिलेल्या व्यक्तीचा कुठलाही हक्क नाही.

सुरेंद्रच्या वहिनींचं म्हणणं आणखी तिखट आहे “हिस्स्याच्या पैशांसाठी आली आहे, नाहीतर तिला आम्ही आठवलोच नसतो. मुलगाही ती पाच वर्षांपासून वडिलांना भेटू देत नाही. आणि आता अचानक प्रेम जागं झालं? नाही  पैसा जागा झाला.”

याच गावासह आसपासच्या भागात अशा अनेक घटना सतत समोर येत असल्याची चर्चा आहे. बीडा प्रकल्पाचा मोबदला येताच संबंध तुटले किंवा जोडले जात आहेत, प्रेमी परतले, पती–पत्नी पुन्हा एकत्र आले, तर काही जिवलग पुन्हा वैरी झाले. पैसा जेथे जातो, तेथे नाती कशी वळणं घेतात याचं जिवंत उदाहरण गावोगाव पाहायला मिळत आहे.

मनाच्या गाठी वर्षानुवर्षे सुटल्या नाहीत… आणि पैशाने वर्षांच्या अंतरालात नात्यांचे अर्थ बदलले. प्रश्न एवढाच 

हे परतलेलं नातं आहे का? की फक्त बँक खात्याच्या रकमेशी जोडलेलं समीकरण?


----------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने