अहमदाबादमधील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका करत बंगाल, तामिळनाडू निवडणुकांतील पराभव आणि 2029 मध्ये मोदींच्या पुनरागमनाचा दावा केला.
अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “राहुलबाबा, तुम्ही थकू नका, अजून अनेक पराभव स्वीकारायचे आहेत. बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणुकाही तुम्हाला हरायच्या आहेत,” असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अहमदाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी ही बोचरी टीका केली.
अहमदाबाद महानगरपालिकेअंतर्गत सुमारे ३३० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना अमित शाह म्हणाले की, २०२९ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आणि भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन होईल. भाजपा हा पक्ष केवळ सत्तेसाठी नाही तर ठोस विचारधारेवर आधारित असून तो थेट जनतेशी जोडलेला असल्याचा दावाही त्यांनी केला.
अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली. भाजपाने राम मंदिर उभारले तेव्हा काँग्रेसने त्याला विरोध केला, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाली तेव्हाही विरोध दर्शवण्यात आला, एअर स्ट्राईकनंतर पुरावे मागितले गेले, असा आरोप त्यांनी केला. बांगलादेशी घुसखोरांविरोधातील कारवाई, काशीतील नव्या मंदिराचे काम, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे आणि तीन तलाक कायदा रद्द करणे या सर्व निर्णयांना काँग्रेसने विरोध केल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
काँग्रेसने नेहमीच राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर नकारात्मक भूमिका घेतली असून जनतेने वारंवार त्यांना निवडणुकांतून उत्तर दिले आहे, असा दावाही त्यांनी केला. येणाऱ्या निवडणुकांतही जनता भाजपाच्या बाजूने उभी राहील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे.
________________________________
