डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताना धोका! SEBI चा गुंतवणूकदारांना इशारा जाणून घ्या नेमकं कारण !

मुंबई : भारतीय भांडवली बाजार नियामक संस्था SEBI (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) ने डिजिटल गोल्ड किंवा ई-गोल्ड उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना गंभीर इशारा दिला आहे. सेबीने स्पष्ट केले आहे की हे डिजिटल गोल्ड उत्पादने सेबीच्या नियामक चौकटीत येत नाहीत आणि त्यामुळे अशा गुंतवणुकींमध्ये मोठा धोका आहे. सेबीचा हा इशारा अशा वेळी देण्यात आला आहे जेव्हा काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स 'डिजिटल गोल्ड' किंवा 'ई-गोल्ड' नावाने सोने खरेदी करण्याचे सुलभ पर्याय म्हणून या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहेत.

सेबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “अशा प्रकारचे डिजिटल गोल्ड उत्पादने ही सेबी-नियमन असलेल्या गोल्ड उत्पादनांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. कारण ना त्यांना सिक्युरिटी म्हणून अधिसूचित केले आहे, ना कमोडिटी डेरिव्हेटिव्ह म्हणून रेग्युलेट केले गेले आहे. त्यामुळे ती सेबीच्या नियामक अधिकारक्षेत्राबाहेर आहेत.” सेबीने याबरोबरच स्पष्ट केले की अशा अनियमित डिजिटल गोल्ड योजनांवर गुंतवणूकदार संरक्षण प्रणाली (Investor Protection System) लागू होणार नाही.

सेबीने गुंतवणूकदारांना सल्ला दिला आहे की ते केवळ सेबी-नियमन असलेल्या साधनांमध्येच गुंतवणूक करावी. यामध्ये म्युच्युअल फंडांद्वारे सादर केलेले गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF), एक्स्चेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स आणि स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGR) यांचा समावेश आहे. या उत्पादनांमध्ये गुंतवणूक केल्यास ती सेबीच्या अधिकृत चौकटीत राहील आणि गुंतवणूकदारांच्या सुरक्षेचे नियम लागू होतील.

दरम्यान, सोन्याच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण नोंदवण्यात आली आहे. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे आणि फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या सावध टिप्पण्यांमुळे गुंतवणूकदारांची धारणा कमी झाल्याने या घडामोडी दिसून आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, डॉलरच्या सततच्या बळकटीमुळे आणि फेडरल रिझर्व्हच्या 'वेट अँड वॉच' धोरणामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. MCX वर डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा भाव १६५ रुपयांनी म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी घसरून शुक्रवारी १,२१,०६७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने