माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) पुन्हा चर्चेत आली आहे, पण यावेळी तिच्या खेळामुळे नव्हे तर तिच्या खासगी आयुष्यामुळे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून झालेल्या घटस्फोटानंतर सानिया प्रचंड मानसिक ताणातून गेली असल्याचं तिनं स्वतः कबूल केलं आहे. अलीकडेच तिच्या नव्या टॉक शो ‘सर्व्हिंग इट अप विथ सानिया’च्या पहिल्या भागात कोरियोग्राफर फराह खान गेस्ट म्हणून आली होती. त्यावेळी सानियाने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाविषयी खुलेपणाने सांगितलं.
सानिया म्हणाली, “तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मला पॅनिक अटॅक यायचे, संपूर्ण शरीर थरथर कापायचं. मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नव्हते. त्या दिवशी फराह खान माझ्या सेटवर आली आणि मला लाईव्ह शोसाठी तयार केलं. जर ती आली नसती, तर मी शो करू शकले नसते.” हे सांगताना सानियाचा आवाज थरथरत होता.
फराह खान हिनेही तो दिवस आठवताना भावनिक होत म्हणाली, “मी देखील घाबरलेली होते. मला त्या दिवशी शूट करायचं होतं, पण मी सगळं सोडून सानियाकडे गेले. कारण मला माझ्या मैत्रिणीच्या सोबत राहायचं होतं.” फराहने सानियाचं कौतुक करताना म्हटलं, “ती एक सिंगल मदर आहे. करिअर, घर, आणि मुलगा यांचं संतुलन ठेवणं खूप कठीण असतं. पण ती हे सगळं अत्यंत ताकदीने करत आहे.”
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचं लग्न एप्रिल 2010 मध्ये झालं होतं. त्यांच्या आयुष्यात 2018 मध्ये मुलगा इझान मिर्झा मलिकचा जन्म झाला. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा सुरू होत्या. शेवटी जानेवारी 2024 मध्ये सानियाने घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. त्याच काळात शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरं लग्न केल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर सानिया एकदम एकटी पडली.
तिच्या या भावनिक कबुलीमुळे सोशल मीडियावर सहानुभूतीचा पूर आला आहे. अनेकांनी “सानिया केवळ एक स्टार नाही, तर एक मजबूत आई आणि धैर्यवान स्त्री आहे” अशा शब्दांत तिचं कौतुक केलं आहे. तिच्या संघर्षकथेनं अनेकांना आयुष्य पुन्हा उभं करण्याची प्रेरणा दिली आहे.
------------------------------------------------------- समाप्त —-------------------------------------------
