मुंबई : भारतातील अग्रगण्य डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe आता OpenAI सोबत हातमिळवणी करत आहे. गुरुवारी फोनपे आणि ओपनएआय यांच्यात एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जाहीर करण्यात आली असून, या भागीदारीमुळे आता भारतातील फोनपे वापरकर्त्यांना थेट ChatGPTच्या एआय सुविधा मिळणार आहेत.
फ्लिपकार्टच्या मालकीचा असलेला हा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्लॅटफॉर्म, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोस्थित एआय दिग्गज ओपनएआयच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आपल्या ॲपमध्ये इंटिग्रेट करणार आहे. या उपक्रमामुळे वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सुलभ, संवादात्मक आणि स्मार्ट होणार असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
कंपनीच्या निवेदनात म्हटलं आहे की, “या सहकार्यामुळे फोनपे कन्झ्युमर ॲप आणि फोनपे फॉर बिझनेस ॲपमधून वापरकर्त्यांना थेट ChatGPTच्या एआय सेवा मिळतील. व्यवहार करताना, शॉपिंग किंवा प्रवासाचे नियोजन करताना एआय मदतीने वापरकर्त्यांना योग्य निर्णय घेणे सोपे होईल.
जरी पूर्ण ChatGPT चॅटबॉट फोनपे ॲपमध्ये थेट उपलब्ध नसेल, तरी वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर ChatGPT-बेस्ड इंटरॅक्टिव्ह अनुभव मिळतील. हे एआय असिस्टंट्स ग्राहकांना रोजच्या गरजा पूर्ण करण्यात, प्रवासाचे नियोजन करण्यात आणि शॉपिंगदरम्यान योग्य ऑफर्स शोधण्यात मदत करतील.
विशेष म्हणजे, ही पहिली कंपनी नाही ज्यांनी ओपनएआयसोबत करार केला आहे. याआधी Razorpay ने देखील ओपनएआय आणि एनपीसीआयसोबत (NPCI) मिळून AI-बेस्ड UPI पेमेंट्स सुरू करण्याची घोषणा केली होती.
या नव्या करारावर प्रतिक्रिया देताना ओपनएआयचे इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी हेड ओलिव्हर जे म्हणाले, “फोनपेसोबतचं आमचं सहकार्य भारतभरातील लोकांपर्यंत एआय अधिक सुलभ आणि उपयुक्त बनवण्याच्या आमच्या उद्दिष्टाला बळकटी देणारं आहे. भारत हा इनोवेशनचा केंद्रबिंदू आहे आणि फोनपेला भारतीय वापरकर्त्यांचा उत्तम अनुभव असल्यामुळे ही भागीदारी नैसर्गिक आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “या सहकार्याद्वारे एआयचा प्रत्यक्ष उपयोग लाखो लोकांच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये दिसेल आणि त्यामुळे भारतातील डिजिटल व्यवहार आणखी वेगवान, स्मार्ट आणि सुरक्षित होतील.”
एकूणच, ओपनएआय आणि फोनपे यांच्या या भागीदारीमुळे आता “पैसे पाठवा” ते “प्लॅन करा” सगळं काही ChatGPTच्या मदतीनं फक्त काही सेकंदांत!
-------------------------------------------------------------------------------------------------
