अहिल्यानगर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही जणांनी त्यांच्या साधेपणाविषयीच्या शिकवणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या टीकेमुळे व्यथित झालेल्या महाराजांनी कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत एक भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
“साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती?” अशा शब्दांत इंदुरीकर महाराजांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांनी टीकाकारांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.
इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी संगमनेर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा राजेशाही पद्धतीने झाला. रथावरून झालेली नवदाम्पत्याची मिरवणूक, पारंपरिक वारकरी वेषातील टाळकरी, बायकांचा फेर आणि उपस्थित मान्यवरांमुळे सोहळ्याला एक वेगळाच रंग चढला होता. तरीही या कार्यक्रमात सत्कार, हार, तुरे आणि शाल-श्रीफळ न स्वीकारता ‘साधेपणाचं उदाहरण’ ठेवण्यात आलं, असे सांगितले जात आहे.
माहितीनुसार, साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक असून मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आहेत. ते उच्च शिक्षित असून, गावाकडे त्यांची बागायती शेती आणि शहरात यशस्वी व्यवसाय आहे. या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबाकडे पुन्हा भक्त आणि चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरील वैयक्तिक टीकेमुळे महाराजांना मानसिक त्रास झाल्याचे दिसून येत असून, “मी कीर्तन सोडतो,” असे त्यांनी आपल्या एका कीर्तनादरम्यान भावनिक स्वरात जाहीर केले. त्यांच्या या विधानानंतर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक भक्तांनी “महाराज कीर्तन सोडणं म्हणजे संस्कृतीचा आवाज थांबवणं” असे म्हणत त्यांना पुन्हा मंचावर यावे, अशी मागणी केली आहे.
इंदुरीकर महाराजांच्या साधेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या सेवाभावाला मान द्यायला हवा, अशी भावना अनेक भक्तांमध्ये व्यक्त होत आहे.
------------------------------------------------- समाप्त —--------------------------------------------------
