पुणे : पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “कोणताही नेता असो किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती असो, चुकी केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. पण कारवाई करताना भेदभाव होऊ नये. भाजपाला ज्यांचा गेम करायचा असतो त्यांच्यावर सुपरफास्ट कारवाई केली जाते, पण फडणवीसांच्या जवळच्या लोकांवर मात्र काहीच होत नाही,” असा आरोप रोहित पवार यांनी केला.
अजित पवारांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर १८०४ कोटींच्या बाजारभावाची जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप झाल्याने राजकीय वादळ उठले. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “आमचं मत स्पष्ट आहे – चुकी करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, पण भेदभाव नको. सरकारने न्याय्य भूमिका घेतली पाहिजे. जेव्हा आम्ही सिडको प्रकरण पुढे आणलं, तेव्हा सरकारच्या विभागांनी कारवाईचा सल्ला दिला, पण ती आजतागायत झाली नाही. मात्र पुणे प्रकरणात वीजेच्या वेगाने कारवाई होते. हे दुहेरी निकष आहेत.”
रोहित पवार पुढे म्हणाले, “जर कोणताही व्यवहार अवैध असेल तर सत्तेतला असो, विरोधातला असो, किंवा व्यावसायिक असो सर्वांवर समान पद्धतीने कारवाई झाली पाहिजे. पण आजचं चित्र वेगळं आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांवर कारवाई होत नाही, आणि ज्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करायचं आहे त्यांच्यावर तात्काळ तपास सुरू होतो. हे राजकीय सूडाचं उदाहरण आहे.”
अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पवार म्हणाले, “कोणताही निर्णय एकटा नेता घेत नाही. काही अधिकारी या निर्णयांना पाठिंबा देतात. ते अधिकारी कोण आहेत, त्यांच्या माध्यमातून काहींची कामं का होतात आणि गरीब जनतेची कामं का होत नाहीत याचाही तपास व्हावा.”
भाजपावर हल्ला चढवताना रोहित पवार म्हणाले, “फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक जमीन घोटाळे झाले. आज राज्यात ‘गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन’ असं सरकार आलं आहे. हे सरकार फक्त सत्तेसाठी आणि लुटमारीसाठी काम करतं.”
पुढे बोलताना त्यांनी संघटनात्मक पातळीवरील भाजपच्या बदलत्या धोरणावरही टीका केली. “अमित शाह यांनीच सांगितलं होतं की भाजपला आता ‘कुबड्यांची गरज नाही’. आता त्याच कुबड्या तोडून चुलीत घालण्याचं काम सुरू आहे. हे सगळं महायुतीच्या अंतर्गत संघर्षाचं प्रतिबिंब आहे,” असं ते म्हणाले.
पार्थ पवार आणि त्यांच्या कुटुंबाबाबत शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत रोहित पवार म्हणाले, “आई म्हणून सुप्रिया ताईंनी भावनिक प्रतिक्रिया दिली, पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली. शरद पवारांनीही ठामपणे आपली भूमिका मांडली. आम्ही शरद पवारांचे कार्यकर्ते आहोत आणि त्यांच्या विचारांनुसारच काम करतो.”
रोहित पवारांच्या या भूमिकेमुळे पुणे जमीन प्रकरणाचा वाद आणखी गडद झाला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांची नवी मालिका सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
