धाराशिव – भूम आणि परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी विरोधकांसह मित्रपक्षही एकत्र आले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार सुरू झाला आहे. भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्वांनी सावंतांविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या हालचालींनी स्थानिक राजकारणात नवा पेच निर्माण केला आहे.
महायुतीतील या हालचालींवर सावंतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “भाजप, शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं, यातच आमचा विजय आहे. आम्हाला फरक पडत नाही. मोठ्या पक्षांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही तरी आम्ही गाफील बसणार नाही,” असं म्हणत सावंतांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर सावंतांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र आगपाखड केली. “ही राष्ट्रवादी काँग्रेसची अशी औलाद आहे जी सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, हे मी आधीच सांगितलं होतं आणि गेल्या महिन्याभरात त्याचा प्रत्यय सर्वांना आला आहे,” अशी टीका त्यांनी केली. सावंत पुढे म्हणाले, “हिंदुत्व त्यांनी स्वीकारलं का? युतीची तत्त्वं मान्य आहेत का? मांडीला मांडी लावून बसतात, पण आमच्यावर त्यांना लादतात. हे योग्य नाही.”
नुकत्याच झालेल्या बैठकीत सावंतांनी अजित पवार गटात गेलेल्या माजी आमदार राहुल मोटे यांच्यावरही निशाणा साधला. “गरज नसताना तुम्ही त्याला का घेतलं?” असा सवाल करत त्यांनी आपल्या नाराजीचा स्पष्ट सूर लावला.
राजकीय पातळीवर सावंतांविरोधात सर्वपक्षीय एकजूट दिसत असतानाच महायुतीतील संवाद आणि समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात स्थानिक पातळीवरील समजुतींचा अभाव दिसून येतो आहे. दुसरीकडे, सावंत मात्र आत्मविश्वासाने म्हणतात, “आमच्याविरोधात कितीही पक्ष एकत्र आले तरी आमचा विजय निश्चित आहे.”
या राजकीय चढाओढीत सावंतांच्या वक्तव्यांमुळे केवळ राष्ट्रवादीवरच नव्हे, तर महायुतीतील तणावावरही पडदा उघडला आहे. भूम-परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी गटातील अंतर्गत नाराजी आणि विरोधकांची एकजूट या दोन्ही घडामोडींमुळे राजकारण नव्या घडामोडींच्या दिशेने जात असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
-----------------–----------------------------------------------------------------------------------
