पुणे : शहरातील नवले पुलावर गुरुवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने एकामागून एक चार वाहनांना जोरदार धडक बसली आणि क्षणात तीन गाड्यांनी पेट घेतला. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, राजस्थान पासिंगचा एक लोडेड ट्रक साताऱ्याकडून पुण्याकडे येत होता. नवले ब्रीजवरील सेल्फी पॉईंटजवळ ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि तो सरळ समोर असलेल्या वाहनांवर जाऊन आदळला. धडकेत एक कार दोन कंटेनरच्या मध्ये अडकली आणि कारने पेट घेतल्यानंतर ट्रक व इतर वाहनांनीही आग पकडली. या भीषण दृश्याने क्षणभर परिसरात धावपळ उडाली.
अपघातानंतर काही काळासाठी नवले ब्रीजवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ब्रेक फेल झालेल्या ट्रकचालकाचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. अधिकारी सांगतात की, “घटनास्थळी ट्रकच्या ब्रेक फेल होण्याचे निशाण स्पष्ट दिसत आहेत. प्राथमिक काम म्हणजे अडकलेले लोक बाहेर काढणे आणि वाहतुकीची व्यवस्था सुरळीत करणे हे आहे.”
दरम्यान, माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं, “या पुलावर दर काही महिन्यांनी अपघात होतात. फक्त कॅमेरे आणि सिग्नल लावून भागणार नाही; इथं वाहतूक नियोजन, रस्ता सुरक्षा आणि स्पीड मर्यादा यावर ठोस काम करावं लागेल.”
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या अपघातावर तात्काळ प्रतिक्रिया देत, “या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी केली आहे.
पुण्यातील नवले ब्रीज हा रस्ता उतारावर असल्याने अनेकदा जड वाहनांचे ब्रेक फेल होण्याच्या घटना येथे घडल्या आहेत. मात्र, पुनःपुन्हा होणाऱ्या या अपघातांवर कायमस्वरूपी उपाय न काढल्याने नागरिक आणि प्रशासन दोघेही हादरले आहेत. एकूणच, नवले पुलावर पुन्हा “मृत्यूचा उतार” ठरला असून, या भीषण अपघाताने पुणेकरांच्या सुरक्षेबद्दलचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
