शेअर बाजारात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रतून NSE च्या ताज्या अहवालात मोठा खुलासा !

मुंबई : भारतात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने या वर्षी एक मोठा टप्पा पार केला आहे. एनएसईवरील युनिक ट्रेडिंग अकाउंट्सची संख्या तब्बल 24 कोटींवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 20 कोटी होती. म्हणजेच फक्त एका वर्षातच 4 कोटींनी वाढ झाली आहे.

ही वाढ दाखवते की भारतातील रिटेल गुंतवणूक आता मुख्य प्रवाहात आली असून, लोक शेअर बाजारात अधिक सक्रिय भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात हे राज्य सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या राज्यांच्या यादीत आघाडीवर आहेत.

एनएसईने दिलेल्या माहितीनुसार, केवळ ट्रेडिंग अकाउंटच नाही तर नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 12.2 कोटींवर पोहोचली आहे. डिजिटल सुविधा, कमी शुल्काचे ऑनलाइन ब्रोकर्स आणि फिनटेक  ॲप्सच्या प्रसारामुळे गुंतवणूक करणे आता पूर्वीपेक्षा खूपच सोपं झालं आहे.

एनएसईच्या आकडेवारीनुसार  महाराष्ट्र : 17% (4 कोटी+ अकाउंट्स) उत्तर प्रदेश : 11% (2.6 कोटी)

गुजरात : 9% (2.1 कोटी) पश्चिम बंगाल : 6% (1.4 कोटी) राजस्थान : 6% (1.4 कोटी) ही आकडेवारी स्पष्ट दाखवते की आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकीची जागरूकता आता भारतभर पसरत आहे.

एनएसईच्या मते, टॉप 5 शहरांमधून जवळपास 49 टक्के ट्रेडिंग अकाउंट्स येतात. यामागचं प्रमुख कारण म्हणजे उत्तम इंटरनेट, फिनटेक ॲप्सचा वापर, रोजगार संधी आणि वित्तीय शिक्षणाची सहज उपलब्धता.

या वाढीमागील मुख्य कारणे म्हणजे, डिजिटल ब्रोकर्सचा प्रसार, सोपं KYC आणि ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा, फिनटेक क्रांती, तरुणांचा वाढता कल, सोशल मीडियावर वित्तीय माहितीचा प्रसार

शेअर बाजारातील वैयक्तिक गुंतवणूकदारांचा वाटा विक्रमी आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत एनएसईवरील लिस्टेड कंपन्यांमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 18.75 टक्क्यांवर पोहोचली आहे. हे मागील 22 वर्षांतील सर्वोच्च स्तर आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एनएसईने 11,875 जनजागृती कार्यक्रम आयोजित केले, ज्यामध्ये तब्बल 6.2 लाख लोकांनी सहभाग घेतला. या उपक्रमांमुळे गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन, फसवणुकीपासून संरक्षण आणि म्युच्युअल फंड, SIP तसेच शेअर बाजाराची समज वाढवण्यात मदत झाली.

31 ऑक्टोबरपर्यंत एनएसईचा इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड 19% वाढून 2,719 कोटी रुपये झाला आहे. हा फंड गुंतवणूकदारांना आर्थिक सुरक्षा आणि विश्वास देतो.

गेल्या पाच वर्षांत निफ्टी 50 ने वार्षिक 15% आणि निफ्टी 500 ने 18% परतावा दिला आहे. अशा मजबूत परफॉर्मन्समुळे नवीन गुंतवणूकदारांचा ओघ वाढला आहे.

एकूणच, 24 कोटी ट्रेडिंग अकाउंट्सचा आकडा हा केवळ एक आकडा नसून भारताच्या नवी वित्तीय विचारसरणीचं प्रतीक आहे. लोक आता फक्त बँकेत बचत न ठेवता, शेअर बाजारातून भविष्यासाठी संपत्ती निर्माण करत आहेत.


       -------------------------------------------------------------------------------------------------------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने