मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘नीली साडीवाली’ एक महिला जोरात चर्चेत आहे. सगळ्या समाज माध्यमावर स्क्रोल केलं की तिचे फोटो सगळीकडे दिसतात. तिला नॅशनल क्रश म्हणलं जात आहे. ही महिला म्हणजे लोकप्रिय मराठी आणि हिंदी अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले. तिच्या एका फोटोने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे.
गिरिजाच्या आकर्षक लूकमुळे अनेक चाहत्यांनी तिची तुलना थेट हॉलीवूड अभिनेत्री सिडनी स्वीनी आणि इटालियन मॉडेल मोनिका बेलुची यांच्याशी केली आहे. पण या चर्चेच्या वादळात गिरीजानं शांत राहणं पसंत केलं नाही. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत कळकळीचं आणि थेट मनाला भिडणारं आवाहन केलं आहे.
गिरिजा म्हणते, “माझा १२ वर्षांचा मुलगा आहे. तो सध्या सोशल मीडिया वापरत नाही, पण पुढे वापरेल. हे जे मॉर्फ केलेले फोटो आहेत, ते त्याला कधीतरी दिसू शकतात. उद्या त्याने माझा असा फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल, याचा विचार करून मला छान वाटत नाही. त्याला माहिती असेल की हा फोटो खरा नाही, पण तरीही कुठेतरी मनाला टोचतं.”
गिरीजा पुढे म्हणते, “आज जे लोक हे फोटो बघत आहेत, त्यांनाही माहिती आहे की ते खरे नाहीत, पण तरीही ते त्यावर लाईक, कमेंट, शेअर करतात. त्यामध्येही एक ‘मजा’ घेतली जाते. पण जरा विचार करा, ज्याचा फोटो आहे, तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर काय परिणाम होतो?”
गिरीजाने या व्हिडिओत एक महत्त्वाचं मुद्दा मांडला आहे. ती म्हणाली, “जे लोक असे फोटो एडिट करून टाकतात, त्यांनी एकदा माझ्या मुलाचा विचार करून पाहावा. आणि जे लोक हे पोस्ट पाहतात, लाईक करतात त्यांनीही एकदा थांबून विचार करा. हे सगळं तुमच्यामुळेच होतंय, याची जाणीव आहे का?”
गिरीजा म्हणते, “या सर्व गोंधळात एक चांगली गोष्ट घडली अनेक नवीन लोकांना माझ्या कामाबद्दल माहिती झाली. त्यांनी माझी चित्रपटं आणि नाटकं शोधून पाहिली, याचा मला आनंद आहे. पण हे जे AI वापरून तयार केलेले फोटो आहेत, ते कुठल्याही कलाकारासाठी योग्य नाहीत.”
तिने चाहत्यांना विनंती केली की, “तुमचं प्रेम असंच ठेवा, पण ते योग्य मार्गाने व्यक्त करा.” व्हिडिओच्या शेवटी ती म्हणाली, “सिनेमागृहात किंवा नाट्यगृहात भेटूच!”
सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ आता प्रचंड चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या भावनिक आवाहनाला पाठिंबा देत, “हे बोलण्यासाठी धैर्य लागतं” असं म्हणत तिला साथ दिली आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
