सर्वात मोठ्या तपासणी मोहिमेत धक्कादायक निष्कर्ष तब्बल १८ टक्के युवक मधुमेहाच्या जोखमीच्या छायेत



भारतामध्ये ३५ वर्षांखालील तब्बल १८ टक्के युवकांना मधुमेहाचा धोका असल्याचा गंभीर निष्कर्ष समोर आला असून, वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांबाबत जागरूकता वाढवण्याची गरज अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. ‘रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया’ या देशातील सर्वात मोठ्या मधुमेह तज्ज्ञ संघटनेने नागपूरसह देशभरातील १० हजार २५८ केंद्रांवर २९ सप्टेंबर २०२१ रोजी एकाच दिवशी मोठी तपासणी मोहीम राबवली. एकूण १० लाख ६४ हजार ९८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, अचूक नोंदणी असलेल्या २ लाख २५ हजार ९५५ नमुन्यांच्या विश्लेषणातून ३५ वर्षांखालील युवकांपैकी १७.९ टक्के जणांना मधुमेहाचे निदान झाल्याचे आढळले. ही निष्कर्षांची मालिका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्येही प्रकाशित झाली आहे. निरीक्षणात २५ वर्षांखालील गटात ९.८ टक्के, ३० वर्षांखालील गटात १३.३ टक्के आणि ३५ वर्षांखालील गटात १७.९ टक्के नागरिकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण दिसून आले. स्थूलपणा आणि निष्क्रीय जीवनशैली असलेल्या युवकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असलेल्या युवकांमध्ये हा धोका ३–४ पट अधिक असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले. ज्यांच्या आई-वडिलांना मधुमेह आहे अशा ३५ वर्षांखालील ४०.१ टक्के नागरिकांत मधुमेह आढळला, तर कुटुंबात असा इतिहास नसलेल्या गटात हे प्रमाण केवळ ६ टक्के होते. पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण ४२ टक्के तर महिलांमध्ये ३७ टक्के इतके नोंदले गेले आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण वाढत्या वयानुसार झपाट्याने वाढत असून, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये हा आजार जवळपास दहा वर्षे आधीच आढळत असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. 

जीवनशैलीतील सुधारणा, नियमित व्यायाम आणि आवश्यक आहारनियमन यामुळे हा आजार टाळता येऊ शकतो, असे ‘रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया’चे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी सांगितले. सरकार आणि नागरिकांनी या वाढत्या धोक्याकडे गांभीर्याने पाहत तत्काळ प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची गरज असल्याची त्यांनी भावना व्यक्त केली.



     ----------------------------------------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने