लॉस एंजेलिस : 100 वर्षांनंतर पुन्हा क्रिकेटचा ऑलिम्पिक मैदानावर पुनरागमनाचा ऐतिहासिक क्षण येतोय! लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी क्रिकेटचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून, या स्पर्धेतील अंतिम सामना 10 ऑगस्ट 2028 रोजी होणार आहे. तीन वर्षांपूर्वीच वेळापत्रक जाहीर झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी 1932 आणि 1984 मध्ये येथे ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या. लॉस एंजेलिस 2028 स्पर्धेचे सीईओ रेनॉल्ड हूवर यांनी सांगितलं की, “या वेळी स्पर्धा अधिक नियोजित आणि प्रेक्षकाभिमुख असतील. 2026 पासून तिकिटांचं वितरण सुरू होणार असून प्रेक्षकांना आपला आवडता सामना पाहण्यासाठी आधीपासून नियोजन करता येईल.”
या स्पर्धेची सुरुवात 15 जुलै 2028 रोजी महिला ट्रायथलॉनने होणार आहे. विशेष म्हणजे, उद्घाटनाच्या दिवशीच 100 मीटर शर्यतींच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत ऑलिम्पिक इतिहासात एकाच दिवशी तीन 100 मीटर शर्यती घेण्यात येणार ही पहिलीच वेळ असेल.
या स्पर्धेत लिंग समानतेच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे. महिला स्पर्धकांची संख्या प्रथमच पुरुषांपेक्षा अधिक असणार असून, ही ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात नवा बेंचमार्क ठरणार आहे.
29 जुलै 2028 हा दिवस “सुपर सॅटर्डे” म्हणून साजरा केला जाणार आहे, कारण या दिवशी तब्बल 23 खेळांमध्ये 26 अंतिम सामने होणार आहेत. यात 15 सांघिक आणि 11 वैयक्तिक स्पर्धांचे सुवर्ण व कांस्य पदकाचे सामने होणार आहेत. त्यामुळे हा दिवस ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक रोमांचक आणि थरारक दिवस ठरणार आहे.
क्रिकेटच्या ऑलिम्पिक पुनरागमनामुळे भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. टी20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहा देशांची पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार आहेत. या सामन्यांसाठी विशेषतः लॉस एंजेलिसच्या आसपासच्या मैदानांची निवड केली जात आहे.
एकूणच, क्रिकेट ऑलिम्पिकच्या मैदानावर परतत आहे, आणि लॉस एंजेलिस 2028 ही स्पर्धा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
