मुंबईत डिजिटल अरेस्टचा धक्कादायक थरार! 58 कोटींचा गंडा ; चीन-हॉंगकॉंग-इंडोनेशिया कनेक्शन !

मुंबई : सायबर गुन्ह्यांच्या मालिकेत आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाला डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाने सायबर विभागाचे धाबे दणाणले असून तपासात चीन, हॉंगकॉंग आणि इंडोनेशिया यांचा मोठा संबंध असल्याचे उघड झाले आहे.

ही ठगी एका अनोळखी फोन कॉलपासून सुरू झाली. सायबर गुन्हेगारांनी स्वतःला CBI आणि EDचे अधिकारी म्हणून ओळख दिली. त्यांनी पीडित व्यावसायिकाला फोनवर चौकशीसाठी तयार राहण्यास सांगितलं आणि नंतर व्हिडिओ कॉलद्वारे “डिजिटल अरेस्ट” करण्यात आला. या दरम्यान पीडित व्यक्तीला भीती दाखवत विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडण्यात आलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही सगळी रॅकेटिंग क्रिप्टोकरन्सी बेस्ड ट्रान्सॅक्शनद्वारे चालते. फसवणुकीतून मिळालेले पैसे विविध क्रिप्टो वॉलेट्समध्ये ट्रान्सफर केले जातात, जे नंतर आंतरराष्ट्रीय नेटवर्कमार्फत गायब होतात. या गँगचं केंद्र परदेशात असल्याचं, आणि गेल्या एका वर्षापासून भारतीय नागरिकांना लक्ष्य केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

ही फसवणूक 19 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबरदरम्यान घडली असून या काळात पीडित व्यावसायिकाकडून टप्प्याटप्प्याने कोट्यवधी रुपये उकळले गेले. ठगांनी तपासाच्या नावाखाली त्याच्याकडून कौटुंबिक माहिती, बँक खात्यांचे तपशील, गुंतवणुकीचे रेकॉर्ड यासारख्या गोष्टी मागून घेतल्या आणि त्याचाच गैरफायदा घेत निधी उचलला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंतरराष्ट्रीय गँगचे नेटवर्क गेल्या वर्षभरात शेकडो भारतीय नागरिकांना लाखो रुपयांनी लुटत आहे. चीन, हॉंगकॉंग आणि इंडोनेशिया येथील क्रिप्टो अकाउंट्स व बँक चेनचा वापर या फसवणुकीसाठी केला जातोय.

अशा प्रकरणांमध्ये सायबर गुन्हेगार कायद्याच्या यंत्रणेतले अधिकारी असल्याचा आव आणतात. ते पीडित व्यक्तीला चौकशीच्या नावाखाली व्हिडिओ कॉलवर ताब्यात घेतल्याचं भासवतात, त्यानंतर त्याच्यावर मानसिक दबाव टाकून बँक व वैयक्तिक माहिती मिळवतात. एकदा खात्याचा तपशील मिळाला की, काही मिनिटांत खाते रिकामे केलं जातं.

मुंबई पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सरकारी अधिकारी सांगणाऱ्या अनोळखी कॉलवर विश्वास ठेऊ नये. अशा कॉल्सची लगेच नोंद सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर द्यावी.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने