एक कोटीची लॉटरी लागली पण विजेता गायब! दवंडी पिटून घेतला जातोय भाग्यवानाचा शोध

मुंबई : नशिबात असेल तर एखाद्याला अशी संपत्ती मिळते की तिला ‘छप्परफाड बरसात’ म्हटलं जातं. अनेकजण आपलं नशीब आजमावण्यासाठी लॉटरीचे तिकीट खरेदी करतात. अशाच एका भाग्यवानाने लॉटरीचं तिकीट घेतलं आणि चक्क एक कोटी रुपयांचं बक्षिस जिंकलं. पण, आश्चर्याची बाब म्हणजे हा भाग्यवान विजेता बक्षिस घेण्यासाठी पुढेच आला नाही! परिणामी, या विजेत्याचा शोध घेण्यासाठी आता गावोगावी दवंडी पिटण्याची वेळ आली आहे.

पंजाबमधील लुधियाना शहरात ही अभूतपूर्व घटना घडली आहे. ओमकार लॉटरी नावाच्या दुकानातून विकल्या गेलेल्या तिकिटावर एक कोटी रुपयांचं बक्षिस लागलं आहे. या तिकिटाचा क्रमांक 7565 आहे. तिकीट सुमारे दोन हजार रुपयांना खरेदी करण्यात आलं होतं. मात्र, बक्षिसाची घोषणा झाल्यापासून काही आठवडे उलटूनही विजेता अद्याप पुढे आलेला नाही.

दुकानमालकांच्या माहितीनुसार, तिकीट घेणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवण्यास नकार दिला होता, त्यामुळे आता त्याचा शोध घेणं अवघड झालं आहे. लॉटरी कंपनीच्या वतीने शहरात ढोल वाजवून आणि दवंडी पिटून या भाग्यवान विजेत्याचा शोध घेतला जात आहे. दुकानदारांनी लोकांना आवाहन केलं आहे की, “ज्याच्याकडे 7565 क्रमांकाचं तिकीट आहे, त्याने तातडीने संपर्क साधावा.”

या तिकीटाची सोडत काही आठवड्यांपूर्वी काढण्यात आली होती. नियमांनुसार बक्षिसावर दावा करण्यासाठी फक्त एक महिन्याची मुदत असते. जर या काळात विजेता पुढे आला नाही, तर एक कोटी रुपयांचं हे बक्षिस रद्द केलं जाणार आहे. कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला ही रक्कम मिळणार नाही.

दुकानमालक म्हणाले, “ही पहिली वेळ नाही की आमच्या दुकानातून विकलेल्या तिकीटावर मोठं बक्षिस लागलं आहे. याआधीही आमच्या तिकीटांना २० लाख आणि ५० लाख रुपयांचं बक्षिस लागलं आहे.” मात्र, इतक्या मोठ्या रकमेसाठी विजेता न येणं हे आश्चर्यकारक आहे.

दरम्यान, लुधियानातील नागरिकांमध्ये आता चर्चेचा एकच विषय आहे हा भाग्यवान विजेता कोण आहे?

संपूर्ण शहरात उत्सुकता आहे की अखेर हा एक कोटी रुपयांचा मालक पुढे येतो का, की ही सुवर्णसंधी वाया जाते. जर पुढील काही दिवसांत तो समोर आला नाही, तर एक कोटी रुपयांचं हे बक्षिस कायमचं संपुष्टात येईल.


    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने