धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; घरीच होणार ‘ही-मॅन’चा उपचार !

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि चाहत्यांच्या मनातील ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांचा पुढील उपचार आता घरीच होणार आहे.

धर्मेंद्र यांची प्रकृती १ नोव्हेंबरपासून बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी त्यांची तब्येत अचानक गंभीर झाल्याने त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या उपचारानंतर त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा झाली. ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पुष्टी केली आहे की, धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर असून, कुटुंबाच्या निर्णयानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अभिनेत्यांना एम्ब्युलन्समधून त्यांच्या घरावर हलवण्यात आलं. सोशल मीडियावर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी नेतानाचा एक व्हिडिओ समोर आला असून, तो सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्वजण त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अद्ययावत माहिती अभिनेत्री हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. ईशाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं  “माध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहेत. माझ्या पप्पांची तब्येत स्थिर आहे आणि ते लवकरच पूर्णपणे बरे होतील. कृपया आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा सन्मान करा. पप्पांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देणाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत.”

धर्मेंद्र यांच्या प्रकृती बिघडल्याचं वृत्त समोर आल्यानंतर अनेक नामांकित कलाकारांनी त्यांची भेट घेतली होती. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनीही धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी त्या अफवांचे तात्काळ खंडन करत स्पष्ट केलं की धर्मेंद्र पूर्णपणे बरे होत आहेत आणि घरी विश्रांती घेत आहेत.

सध्या धर्मेंद्र यांच्या घरावर वैद्यकीय तज्ज्ञांची देखरेख ठेवण्यात आली असून, उपचार त्यांच्या घरगुती वातावरणातच सुरू आहेत.


    

   -----------------------------------------------------------------------------------------------------------------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने