दिल्ली : लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या एक दिवस आधी सुरक्षा यंत्रणांनी एका महिला डॉक्टरला अटक केली होती. ही महिला म्हणजे डॉ. शाहीन शाहिद, जी सध्या चर्चेत आहे कारण ती जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या महिला विंग ‘जमात-उल-मोमिनीन’ची भारत प्रमुख (इंडिया हेड) असल्याचा संशय आहे. तपासात समोर आलं आहे की ती जैश सरगना मसूद अझहरची बहिण सादिया अझहर हिच्या थेट निर्देशावर काम करत होती.
दिल्ली स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले. हा स्फोट झाल्यानंतर एका दिवस आधी जम्मू-कश्मीर पोलिस आणि यूपी एटीएसने संयुक्त कारवाई करून शाहीन शाहिदला पकडले होते. तिचं नाव त्या दहशतवादी नेटवर्कशी जोडले गेले आहे ज्याचं नाव या स्फोटानंतर समोर आलं.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शाहीन शाहिदचा संबंध फरीदाबादमध्ये पकडलेल्या दोन डॉक्टर डॉ. मुज्जमिल अहमद आणि डॉ. उमर नबी यांच्याशी होता. हे तिघेही वैद्यकीय व्यवसायाच्या आडून व्हाईट कॉलर टेरर नेटवर्क चालवत होते. शाहीन शाहिद हिला या संघटनेच्या भारतातील प्रमुख म्हणून ओळखलं जात होतं.
शाहीनच्या लखनऊ येथील घरावर जम्मू कश्मीर पोलिस आणि यूपी एटीएसने छापा टाकून काही कागदपत्रं, हार्ड डिस्क, आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. याच कारवाईत तिचा भाऊ डॉ. परवेज अन्सारी, जो इंटीग्रल युनिव्हर्सिटीत अध्यापन करतो, त्यालाही अटक करण्यात आली आहे.
डॉ. शाहीन पूर्वी कानपूरमधील गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेज (जीएसव्हीएम) येथे लेक्चरर होती. तिने 2006 मध्ये नोकरी सुरू केली पण 2013 मध्ये विनाअनुमती रजा घेऊन गायब झाली. कॉलेज प्रशासनाने अनेकदा नोटिसा पाठवूनही प्रतिसाद न मिळाल्याने 2021 मध्ये तिची सेवा समाप्त करण्यात आली.
तिचं वैवाहिक जीवनही वादग्रस्त राहिलं. शाहीनची महाराष्ट्रातील जफर हयात या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं, मात्र 2015 मध्ये तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती फरीदाबादला राहू लागली, जिथे तिची ओळख डॉ. मुज्जमिल अहमदशी झाली आणि नंतर ती थेट मसूद अझहरच्या बहिण सादियाच्या संपर्कात आली.
तपासात तिच्या कारमधून रायफल आणि जिवंत कारतूस सापडले असून ते दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे
सध्या या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करत आहे. एजन्सी शाहीन शाहिदचे शैक्षणिक रेकॉर्ड, सोशल मीडिया कनेक्शन आणि परदेशातील संपर्क तपासत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहीन सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानमधील हँडलर्सशी संपर्कात होती आणि भारतात कट्टरपंथी महिलांचे नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न करत होती.
या प्रकरणामुळे पुन्हा स्पष्ट झालं आहे की दहशतवाद आता केवळ शस्त्रास्त्रांपुरता मर्यादित नाही, तर तो शिक्षण, सोशल मीडिया आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून समाजात शिरत आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
