मुंबई : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) आता एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या महिलांनी अजूनपर्यंत या योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्या महिलांचा हप्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य देणे हा आहे. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, आणि ज्या कुटुंबाच्या नावावर कोणतेही चारचाकी वाहन नाही, अशा महिलांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जातात.
मात्र, गेल्या काही महिन्यांत या योजनेचा गैरवापर झाल्याचं सरकारच्या तपासात समोर आलं आहे. अनेक अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं आहे, ज्या निकषात बसत नाहीत — म्हणजेच काहीजणी सरकारी नोकरीत असूनही लाभ घेत आहेत. त्यामुळे शासनाने आता अपात्र लाभार्थ्यांची नावं योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर, लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे. जर लाभार्थी महिलांनी नियोजित वेळेत केवायसी केली नाही, तर त्यांच्या खात्यात जमा होणारा हप्ता थांबवला जाणार आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच पात्र महिलांकडे केवळ आठ दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जर केवायसी वेळेत पूर्ण झाली नाही, तर हप्ता बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, 18 नोव्हेंबरनंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या नजीकच्या बँकेत किंवा अधिकृत सेवा केंद्रात जाऊन तातडीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत लाखो महिलांना थेट आर्थिक मदत मिळत आहे, परंतु गैरवापर रोखण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी आता सरकारने केवायसी तपासणीला प्राधान्य दिले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
