मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवेमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. 10 नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूबद्दल अफवा पसरू लागल्या. काही माध्यमांनी ते व्हेंटिलेटरवर असल्याचा दावा केला. मात्र, पत्नी हेमा मालिनी आणि कुटुंबियांनी निवेदन जारी करत धर्मेंद्र पूर्णपणे सुरक्षित असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं स्पष्ट केलं. तरीही सोशल मीडियावर अफवांचा सुळसुळाट सुरूच राहिला.
धर्मेंद्र यांच्याबद्दल पसरलेल्या या अफवेमुळे बॉलिवूड चाहत्यांना धक्का बसला असला तरी, ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक दिग्गज स्टार्सच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या, ज्यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, शाहरुख खान, कतरिना कैफ यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
बॉलिवूडचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांच्याही मृत्यूच्या अफवा काही वर्षांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांच्या अमेरिकेत झालेल्या कार अपघातात निधन झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. चाहत्यांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळानंतर बिग बी यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी फेक असल्याचं स्पष्ट केलं आणि “मी जिवंत आणि निरोगी आहे” असं सांगितलं.
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दलही 2011 आणि 2016 मध्ये अशाच प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी ते आजारी असल्याची माहिती व्हायरल झाली होती आणि काही माध्यमांनी त्यांच्या निधनाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यांच्या टीमनं तातडीने निवेदन देत स्पष्ट केलं, “रजनीकांत अमेरिकेत आहेत आणि पूर्णपणे निरोगी आहेत. कृपया अशा खोट्या अफवांकडे दुर्लक्ष करा.”
2017 मध्ये शाहरुख खान यांच्या मृत्यूची अफवा युरोपियन न्यूज नेटवर्क्सकडून पसरवण्यात आली होती. एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. काही वेळातच ही बातमी सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली. मात्र, शाहरुखनं विनोदी शैलीत ट्विट करत ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आणि “आठवड्यातून तीन वेळा मरतोय असं वाटतंय” असं म्हणत चाहत्यांना दिलासा दिला.
तरुण अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याही निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. काही फेक अकाउंट्सनं तिच्या निधनाची पोस्ट केली होती, मात्र तिच्या कुटुंबानं आणि मॅनेजमेंट टीमनं ती बातमी त्वरित फेटाळली.
धर्मेंद्रप्रमाणेच आंतरराष्ट्रीय सुपरस्टार जॅकी चॅन हेदेखील मृत्यूच्या फेक बातम्यांना बळी पडले आहेत. 2015 आणि 2023 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या बातम्या अनेकदा व्हायरल झाल्या. मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या कुटुंबानं आणि टीमनं निवेदन देत या अफवांचं खंडन केलं.
माधुरी दीक्षित, अजय देवगण, आयुष्मान खुराना, नसीरुद्दीन शाह, शक्ती कपूर, काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांसारखे अनेक कलाकार देखील सोशल मीडियावरील या मृत्यूच्या अफवांचे बळी ठरले आहेत.
सोशल मीडियाच्या वेगवान युगात अशा फेक बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये घबराट निर्माण होते. त्यामुळे कलाकारांनी वारंवार आवाहन केलं आहे की, कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी ती अधिकृत स्रोतातूनच तपासावी.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
