मुंबई : ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि गुंतवणूक सल्लागार रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी पुन्हा एकदा आपल्या भविष्यवाणीमुळे जागतिक बाजारात खळबळ उडवून दिली आहे. कियोसाकी यांनी अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक पोस्ट शेअर करत सोन्या-चांदीच्या दराबाबत थरकाप उडवणारे अंदाज व्यक्त केले आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील एका वर्षात 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल $27,000 प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. जर हा अंदाज खरा ठरला, तर भारतीय बाजारात सोन्याची किंमत प्रति 100 ग्रॅम सुमारे 24 लाख रुपयांवर झेप घेईल. कियोसाकींच्या मते, सध्याचा आर्थिक ताण आणि जागतिक चलन बाजारातील अस्थिरता पाहता, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे “आयुष्यभराचं सुवर्णसंधीचं वर्ष” ठरू शकतं.
कियोसाकी म्हणतात, “अर्थव्यवस्था क्रॅशच्या उंबरठ्यावर आहे. पण विक्री न करता मी अजूनही सोने आणि चांदीची खरेदी करत आहे. पुढील वर्षात या मौल्यवान धातूंमध्ये विक्रमी तेजी पाहायला मिळेल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, अमेरिकन बाजारात आणि COMEX वर सोन्याची किंमत $27,000 पेक्षा जास्त जाऊ शकते.
सोन्याबरोबरच कियोसाकी यांनी चांदीबाबतही मोठा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, 2026 पर्यंत चांदीचा दर प्रति किलो $100 वर जाऊ शकतो. म्हणजेच भारतीय बाजारात किलोभर चांदी खरेदी करण्यासाठी 3 लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागू शकते. त्यामुळे सोन्याप्रमाणेच चांदीही गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं मेटल ठरणार आहे.
कियोसाकी केवळ पारंपरिक धातूंवरच नाही, तर डिजिटल चलनावरही विश्वास ठेवतात. त्यांच्या मते, 2026 पर्यंत बिटकॉइन $2,50,000 पेक्षा जास्त दराने ट्रेड होईल, तर इथरियम $60,000 च्या पुढे झेप घेऊ शकेल.
कियोसाकी यांनी अमेरिकन आर्थिक धोरणावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “यूएस फेडरल रिझर्व्ह आणि ट्रेझरी नियमांचे उल्लंघन करून अमेरिका सतत बनावट पैसे छापत आहे. जगातील सर्वात मोठा कर्जदार देश म्हणून अमेरिका टिकू शकत नाही. म्हणूनच सोनं आणि चांदीसारख्या दुर्मिळ वस्तूंमध्ये गुंतवणूकच खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे.”
कियोसाकींच्या या पोस्टनंतर जागतिक बाजारात पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्या भाकितानुसार जर हे दर खरे ठरले, तर सोनं खरेदी करणं मध्यमवर्गीयांसाठी स्वप्नवत होईल, आणि गुंतवणूकदारांसाठी हे आर्थिक क्रांतीचं वर्ष ठरेल.
------------------------------------------------------------------------------------------------------
