दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ रविवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटाने राजधानी हादरली आहे. संध्याकाळी ६.५२ वाजता झालेल्या या भीषण विस्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. स्फोट इतका तीव्र होता की आसपासचा परिसर हादरून गेला, आणि मेट्रो स्टेशन परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही हुंडई i20 कार स्फोटाच्या आधी तब्बल तीन तास सुनहरी मशिदीच्या जवळ पार्क करण्यात आली होती.
या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांनी तपास सुरु केला असता, या घटनेमागे फिदायीन हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत या संपूर्ण कटात काही डॉक्टरांचा थेट सहभाग असल्याचा संशय आहे, आणि त्यांची दुवे हरियाणातील अल-फलाह विद्यापीठाशी जोडलेली आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या काही तास आधी जम्मू-कश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जवळपास २,९०० किलो IED केमिकल, शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला होता. हा साठा जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अंसार गजवात-उल-हिंद (AGuH) या दोन दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कशी संबंधित होता. या जप्तीच्या वेळेचा आणि दिल्ली स्फोटाचा कालावधी अत्यंत जवळचा असल्याने दोन्ही घटनांमध्ये थेट संबंध असल्याचे दिसत आहे.
डॉ. आदिल अहमद राठर, जो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होता, त्याला जम्मू-कश्मीर पोलिसांनी अटक केली. त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफल सापडली असून त्याचे संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंद या संघटनांशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरी अटक हरियाणातील फरीदाबादमध्ये झाली. अल-फलाह विद्यापीठात कार्यरत असलेल्या लखनऊच्या डॉ. शाहीन शाहिद हिच्या कारमधून “कॅरोम कॉक” नावाची असॉल्ट रायफल सापडली आहे. तिची ओळख आणि या नेटवर्कमध्ये तिची भूमिका अद्याप तपासाअंतर्गत आहे.
गुजरात एटीएसने अटक केलेल्या डॉ. अहमद मोहियुद्दीन सैयद या डॉक्टरकडे ‘रिसिन’ नावाचे अत्यंत विषारी रासायनिक शस्त्र तयार करण्याचा पुरावा सापडला आहे. तो मूळचा हैदराबादचा असून चीनमध्ये शिक्षण घेतलेला आहे. तपासानुसार त्याने दिल्लीतील आजादपूर मंडी, अहमदाबादमधील नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनऊ येथील RSS कार्यालय यांसारख्या ठिकाणांची अनेक महिन्यांपासून रेकी केली होती.
दरम्यान, फरीदाबाद पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी डॉ. मुझमिल शकील नावाच्या काश्मिरी डॉक्टरला अटक केली. तो देखील अल-फलाह विद्यापीठात अध्यापन करत होता. त्याच्याकडून ३६० किलो अमोनियम नायट्रेट आणि नंतर त्याच्या दुसऱ्या ठिकाणावरून २५६३ किलो विस्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. शकीलचे दहशतवादी संघटनांशी थेट संबंध असल्याचेही समोर आले आहे.
याचवेळी स्फोट झालेली कार दक्षिण कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील डॉ. उमर मोहम्मद या डॉक्टरच्या नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती मिळाली आहे. स्फोटाच्या वेळी तोच त्या कारमध्ये उपस्थित असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.
या पाचही डॉक्टरांवर गंभीर आरोप आहेत. हे सर्वजण शिक्षित असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाचा वापर मानवी सेवेसाठी नव्हे, तर विनाशासाठी केला आहे. या प्रकरणामुळे तपास यंत्रणांना देशातील प्रतिष्ठित शिक्षित वर्गामध्ये दहशतवादाच्या मुळांचा धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त होत आहे.
तपास अजूनही सुरू असून, राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA), दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि इतर गुप्तचर यंत्रणा या साखळीचा उलगडा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दोषींना कठोर शिक्षा देण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
सध्याच्या घडीला दिल्ली, हरियाणा, जम्मू-कश्मीर आणि गुजरात या चार राज्यांमध्ये सतर्कतेचा आदेश जारी करण्यात आला आहे. नागरिकांना अफवा पसरवू नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------------------------------------- समाप्त —-----------------------------------------------------
