मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या निधनाच्या अफवा आज सकाळपासून सोशल मीडियावर पसरू लागल्या होत्या. मात्र या सर्व अफवा असल्याचं त्यांच्या कुटुंबाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं कुटुंबाने सांगितलं आहे.
काल (१० नोव्हेंबर) धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज (११ नोव्हेंबर) सकाळी त्यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर आणि काही डिजिटल माध्यमांवर पसरू लागल्या. या अफवांमुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. तथापि, धर्मेंद्र यांच्या मुलगी अभिनेत्री इशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी दोघींनी सोशल मीडियावर पोस्ट करून धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याचं आणि अफवा निराधार असल्याचं स्पष्ट केलं.
इशा देओलने लिहिलं, “बाबांची प्रकृती स्थिर आहे, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.” तर हेमा मालिनी म्हणाल्या, “जे घडत आहे ते अक्षम्य आहे. जबाबदार माध्यमांनी उपचार घेत असलेल्या व्यक्तीबद्दल अशा खोट्या बातम्या पसरवणं हे अत्यंत बेजबाबदार आणि अनादरपूर्ण आहे. कृपया कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा.”
धरमसिंह देओल उर्फ धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील साहनेवाल येथे झाला. त्यांनी १९६० मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. शोले, चुपके चुपके, सत्यकाम, मेरा गाव मेरा देश, धर्म वीर, आणि अलीकडील रॉकी और रानी की प्रेम कहानी हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याशी १९५४ मध्ये विवाह केला होता. त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल असे दोन सुप्रसिद्ध अभिनेते पुत्र असून दोन कन्या विजयता आणि अजिता आहेत. दुसऱ्या विवाहात त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनीशी १९८० मध्ये लग्न केलं, त्यांना ईशा आणि आहाना या दोन मुली आहेत.
त्यांनी विजयता फिल्म्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली, ज्याद्वारे त्यांनी आपल्या मुलांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून दिलं. धर्मेंद्र यांनी २००४ ते २००९ या काळात भाजपच्या तिकिटावर बिकानेर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही केलं.
१९९७ मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि २०१२ मध्ये भारत सरकारकडून पद्म भूषण सन्मान मिळाला.
सध्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुटुंबीयांनी चाहत्यांना संयम बाळगण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
---------------------------------------------------- समाप्त —-------------------------------------
